ताज्या घडामोडीपिंपरी

प्लास्टिक बंदीबाबत पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज!

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केली जाणार दंडात्मक व कायदेशीर कारवाई

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – राज्यातील प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आता युद्धपातळीवर सक्रिय झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ग्राहक व विक्रेत्यांविरुद्ध बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वापरावर कारवाई सुरू करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशा प्रकारचा वापर आढळल्यास दंडात्मक कारवाईसोबतच कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्लास्टिक लेप असलेल्या किंवा प्लास्टिक थर असलेल्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. या अधिसूचनेअंतर्गत पेपर किंवा ॲल्युमिनियमवर प्लास्टिकचा थर असलेले डिश, कप, प्लेट, वाडगे, कंटेनर, चमचे, ग्लास इत्यादी एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तू पूर्णपणे बंदीच्या यादीत समाविष्ट आहेत.

या निर्णयाचा उद्देश दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणे हा आहे. कारण प्लास्टिकचे विघटन अत्यंत कठीण असून त्यातून गंभीर पर्यावरणीय प्रदूषण निर्माण होते. अनेक वेळा हा प्लास्टिक कचरा जलाशयांमध्ये फेकला जातो किंवा जाळला जातो, ज्यामुळे हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण देखील वाढते.

अशी आहे दंडाची तरतूद :
पहिल्यांदा उल्लंघन आढळल्यास – ५,००० रुपये दंड

दुसऱ्यांदा उल्लंघन आढळल्यास – १०,००० रुपये दंड

तिसऱ्यांदा उल्लंघन आढळल्यास – २५,००० रुपये दंड आणि पुढील कायदेशीर कारवाई

प्रभागनिहाय पथकांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड महापालिकेने प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांना दंड आकारणी व जप्तीची कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. दुकाने, बाजारपेठा तसेच मोठ्या किरकोळ केंद्रांवर नियमित तपासणी मोहीम राबवली जात आहे. तरी नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबविण्यात आलेली प्लास्टिक बंदी मोहीम ही केवळ एक मोहिम नसून ती पर्यावरणाच्या संरक्षणाशी निगडित आहे. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा. स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त पिंपरी चिंचवड शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा.
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी महापालिका जनजागृतीबरोबरच तपासणी मोहिमाही राबवत आहे. बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करून स्वच्छ, हरित आणि सुंदर शहर निर्मितीस हातभार लावावा.
डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button