शहराला नियमित पाणी हवे महाविकास आघाडी महिला आक्रमक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना रोजच्या रोज पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पावना धरण परिसरात त्यांनी “पवना माई”चे जलपूजन करत आंदोलनाचा नारळ फोडला.
सध्या पवना धरण हे 90% भरलेले असून, मावळ परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे तिथे पाणीटंचाईचा प्रश्न सुटलेला आहे. मात्र, शहराच्या नशिबी अजूनही कोरडाच घसा येतोय. “धरण उशाला आणि कोरड आमच्या घशाला” अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्या म्हणाल्या की, निवडणुकीच्या वेळी अनेक राजकीय नेत्यांनी पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर महिन्यांनंतरही पिंपरी-चिंचवडकरांना अजूनही नियमित पाणी मिळत नाही. दररोज सकाळीच पाणी द्यावे, संध्याकाळचा पाणीपुरवठा थांबवावा आणि स्थिर वेळापत्रक असावा, अशी मागणी त्यांनी केली.








