ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय भवनातील मॉकड्रिलचे यशस्वी आयोजन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र धुरांचे लोळ..सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाचे फोन खणाणले… लगेच सर्वत्र सायरनचा आवाज…यावेळी उपस्थित दोन हजार नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण….सर्वत्र धावाधाव सुरु… काहीतरी आपत्ती जनक घटना घडली म्हणून सुरक्षा यंत्रणेने तत्काळ चक्रे फिरवली…आणि अग्निशमन विभागाची वाहने त्वरीत पोहोचली आणि प्रशासकीय भवनात असलेल्या २ हजारांहून अधिक कर्मचारी,नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. या घटनेत ८ पुरुष व २ महिला जखमी झाल्या त्यांना ॲम्ब्युलन्सच्या मदतीने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. अवघ्या १५ मिनिटात भयावह परिस्थिती आटोक्यात आणली गेली,तेव्हा नागरिक व कर्मचाऱ्यांनी सोडला निश्वास.. या घटनेला निमित्त होते केंद्रीय गृह विभागाने दिलेले मॉकड्रिल (Mock Drill) घेण्याचे निर्देश….

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे त्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने मॉकड्रिल (Mock Drill) घेण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीमध्ये शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आदेश जितेंद्र डूडी यांच्या सूचनेनुसार तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय भवनात सायं. ४ वाजता मॉकड्रिलचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

या सरावामध्ये नागरी संरक्षण वॉर्डन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पोलीस, अग्निशमन सेवा, तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांचे स्वयंसेवक सहभागी झाले होते तसेच महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना उत्तम साथ दिली. सीमावर्ती भाग आणि महानगरांमध्ये महत्त्वाची पायाभूत सुविधा आच्छादन (camouflage) आणि नियंत्रण कक्षांच्या कार्यक्षमतेचीही चाचणी घेण्यात आली.

या मॉकड्रिल मोहिमेमध्ये अग्निशमन विभागाच्या ४ वाहनांसह २० अधिकारी, कर्मचारी, ॲम्ब्युलन्सची ४ वाहने व १६ कर्मचारी तर सुरक्षा विभागाचे ५२ अधिकारी कर्मचारी ,पोलीस अधिकारी,कर्मचारी असे ३७ जण तसेच वाहतूक पोलीसांचे २४ जण, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे १ अधिकारी एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजनेचे ४६ स्वयंसेवक, १८ आपदा मित्र यावेळी सहभागी झाले होते.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय भवनात देखील मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉकड्रिल दरम्यान सायरन वाजवला गेला. तत्काळ महापालिकेतील कर्मचारी व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले गेले. बचाव पथकांनी तात्काळ दाखल होत कार्यवाही केली. संपूर्ण सराव नियोजनबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडला.

देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या प्रशासकीय भवनातील सुरक्षा यंत्रणा सज्जता तपासण्यासाठी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना मदत व मार्गदर्शन पोहचविण्याची खबरदारी म्हणून या मॉकड्रिलचे आयोजन आकरण्यात आले होते.

ही नागरी संरक्षण मोहिम युद्धजन्य परिस्थिती, दहशतवादी हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले यांसारख्या आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्यासाठी नागरी आणि प्रशासकीय यंत्रणांची तयारी तपासण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत आहे. यामध्ये हवाई हल्ला इशारे, विद्युत अंधार (ब्लॅकआउट), स्थलांतरण योजना, आणि नागरिकांचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे
या प्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष निरीक्षण केले. त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादाची गरज अधोरेखित केली. तसेच मॉकड्रिल दरम्यान सुरक्षा यंत्रणेने दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्व यंत्रणाचे कौतुक देखील केले.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील वातावरण तणावाचे झाले असून त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह विभागाच्या वतीने देशभरात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. आपत्ती कोणतीही पूर्वसूचना न देता येते, त्यामुळे अशा मॉकड्रिलच्या माध्यमातून यंत्रणांचे प्रशिक्षण आणि सज्जता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात अशा अधिकाधिक मॉकड्रिल उपक्रमांचे आयोजन करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका सदैव कटिबद्ध राहील,

-तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त (3) , पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button