महापौरपदाचा सस्पेन्स संपणार! ६ फेब्रुवारीला फैसला, २७ ला कार्यक्रम
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नवा महापौर ६ फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे खुर्चीवर विराजमान होणार असून, त्या दिवशी महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशामुळे प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळाली असली तरी, राजकीय पातळीवर मात्र महापौरपदाच्या शर्यतीला वेग आला आहे. महापौरपदाचा बहुमान नेमका कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
विभागीय आयुक्तांनी महापौर निवड प्रक्रियेबाबत शुक्रवारी (दि. २३)आदेश जारी केले. त्यानुसार मंगळवारी (दि. २७) महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून, त्यामध्ये निवड प्रक्रियेचे वेळापत्रक, उमेदवारी अर्ज दाखल करणे, मतदान आणि निकाल याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती नगरसचिव मुकेश कोळप यांनी दिली.
महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून, अंतर्गत गटबाजी, प्रादेशिक समतोल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. कोणत्या प्रभागाला संधी द्यायची, अनुभवाला प्राधान्य द्यायचे की नवख्या चेहऱ्याला पुढे आणायचे, यावरून पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे.
दिल्ली, मुंबईचाही प्रभाव पडणार…
शहरातील सर्व गटांकडून वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग सुरू असून, ‘दिल्ली’ आणि ‘मुंबई’ पातळीवरील चर्चांचाही महापौर निवडीवर प्रभाव राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उपमहापौरपद, स्थायी समितीचे पदाधिकारी आणि विषय समित्यांचे अध्यक्षपद यांची जुळवाजुळवही या निवडीशी जोडली जाणार असल्याने राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
६ फेब्रुवारीच्या सभेपर्यंत पक्षांतर्गत हालचाली, शक्तिप्रदर्शन आणि संभाव्य नावांबाबत तर्कवितर्क सुरूच राहणार असून, अखेर महापौरपदाचा मान कोणाच्या गळ्यात पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




















