पिंपरी चिंचवड मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीस ‘स्व. अजितदादा पवार भवन’ नाव द्यावे; प्राणांगणात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची योगेश बहल यांची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव अजरामर राहावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस ‘स्वर्गीय अजितदादा पवार भवन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ असे नामकरण करण्यात यावे, तसेच त्या इमारतीच्या प्राणांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील विविध लोकप्रतिनिधी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे.
स्व. अजितदादा पवार यांनी सन १९९२ ते २०१७ या कालावधीत पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराला स्वच्छ, सुंदर आणि सर्वसुविधायुक्त स्वरूप प्राप्त झाले. केंद्र व राज्य शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर, प्रेक्षागृहे, उद्याने, व्यायामशाळा, रुग्णालये तसेच मुलींसाठी आयटीआय यांसारख्या अनेक विकासकामांमुळे शहराच्या वैभवात मोठी भर पडली. याच कामगिरीची दखल घेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहराला ‘बेस्ट सिटी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला होता.
शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता विद्यमान महापालिका इमारत अपुरी पडत असल्याने, मध्यवर्ती ठिकाणी नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारत उभारण्याची संकल्पना स्व. अजितदादा पवार यांची होती. या इमारतीचे डिझाईन व इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले. मात्र, दुर्दैवाने हे स्वप्न पूर्णत्वास जाण्यापूर्वीच त्यांचे अपघाती निधन झाले.
त्यामुळे शहरवासीयांच्या भावना लक्षात घेता, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व आदरांजली म्हणून नवीन प्रशासकीय इमारतीस त्यांचे नाव देण्यात यावे आणि प्राणांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने केली आहे.




















