ताज्या घडामोडीपिंपरी

अतिरिक्त आयुक्तांनी विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा प्रभागनिहाय घेतला आढावा

पिंपरी चिंचवड महापालिकेची गणेशोत्सवपूर्व तयारी वेगात

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी महापालिकेच्या ग, ड आणि ह प्रभागातील तर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी अ, ब प्रभागातील महत्त्वाच्या गणेश विसर्जन घाटांची पाहणी करून आवश्यक सोयीसुविधांचा सखोल आढावा घेतला.

शहरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी घाटांवर येतात. यंदाही या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने विशेष तयारी केली आहे. त्याअंतर्गत विविध घाटांवरील सुविधा, स्वच्छता व सुरक्षा यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी ग प्रभागातील सुभाषनगर घाट, पवनेश्वर घाट, महादेव मंदिर घाट, दत्त मंदिर घाट, ड प्रभागातील पुनावळे राम मंदिर शेजारील घाट, पिंपळे निलख येथील इंगवले पूल घाट, पिंपळे गुरव घाट तसेच ह प्रभागातील कासारवाडी स्मशानभूमी लगतचा विसर्जन घाट, दापोडी येथील हॅरीस ब्रिज घाट आणि जुनी सांगवी येथील श्री. वेताळ महाराज घाट अशा विविध ठिकाणांना भेट दिली. तर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी रावेत, चिंचवडगाव, निगडी, काळेवाडी या भागातील विसर्जन घाटांना भेट देत पाहणी केली.

या पाहणीदरम्यान त्यांनी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, कृत्रिम विसर्जन हौदांची स्थिती, प्रकाशयोजना, दिशादर्शक फलक, निर्माल्य कुंड, वाहतूक व्यवस्थापन, तसेच आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. सर्व विसर्जन घाटांवर स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावेत, निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र कुंड आणि वाहने उपलब्ध ठेवा, गर्दीच्या नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षक व स्वयंसेवकांची पथके तैनात करा, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळण्यासाठी मोफत वैद्यकीय मदत केंद्रे व अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करा, तसेच वाहतूक व्यवस्थापन सुरळीत राहण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.

या पाहणीवेळी महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विसर्जन घाटांवरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी निर्माल्य व प्लास्टिक कचऱ्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावा. कृत्रिम विसर्जन हौदे व नदी घाटांची नियमित स्वच्छता करा, अशा सूचना आज पाहणी दरम्यान दिल्या आहेत.

– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच विसर्जन घाटांवर अधिक काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मूर्ती संकलनाची योग्य व्यवस्था करा. सर्व संबंधित विभागांनी नियोजित कालावधीत आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना आज पाहणी दरम्यान दिल्या आहेत.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button