महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण तर अनुभवी कर्मचाऱ्यांची उजळणी

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने विभागातील यंत्रसामग्री, उपकरणे आणि वाहनांची कार्यक्षमता तपासण्यासाठी तसेच नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास सक्षम करण्यासाठी विशेष उजळणी आणि प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण सत्रात अग्निशमन सेवेत नुकतेच सरळसेवेने नियुक्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी तसेच कार्यरत अनुभवी कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये अग्निशमन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, घटनास्थळी त्वरीत कृती, तांत्रिक कौशल्ये, आणि विविध उपकरणांच्या वापराबाबत सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
सत्रात रनिंग, पी.टी., स्कॉट ड्रिल, बचाव उपकरणे, रोप रॅपलिंग, न्यूमॅटिक एअर लिफ्टिंग बॅग, हायड्रॉलिक उपकरणे, आस्का लाइट, बीए सेट आणि बीए व्हॅन, तसेच अंडर वॉटर कॅमेरा, बोटिंग, लिफ्ट रेस्क्यू, ईव्ही फायर, क्लोरीन गळती रेस्क्यू, गॅस डिटेक्टर, सीपीआर, हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, फोम टेंडर इत्यादींचा वापर प्रत्यक्ष सरावाद्वारे शिकवण्यात आला. याशिवाय शहराची टोपोग्राफी, हॉस्पिटल आणि मॉल व्हिजिट, फायर सप्रेशन सिस्टम, फायर पंप आणि विविध ड्रिल्सही सत्राचा भाग होते.
ही उजळणी मोहीम उप अग्निशमन अधिकारी विकास नाईक आणि रुपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. याच पद्धतीने इतर उपकेंद्रांमध्येही अशा प्रकारचे सत्रे राबवण्याचा विभागाचा मानस असून, विभागाची १०० टक्के कार्यक्षमता साधण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची सतत क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी अशा प्रशिक्षण सत्रांची नितांत गरज आहे. आधुनिक उपकरणांचा योग्य वापर आणि तांत्रिक कौशल्ये हीच आजच्या काळात प्रभावी बचावाची गुरुकिल्ली ठरते. विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या सत्रात उत्तम सहभाग नोंदवला, ही समाधानाची बाब आहे,
– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, अग्निशमन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
हे प्रशिक्षण आमच्यासाठी खूप उपयोगी ठरले. थेट सरावामुळे आत्मविश्वास वाढला. आपत्कालीन प्रसंगी योग्य पद्धतीने काम करण्यासाठी हे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.
– प्रथमेश भोसले, अग्निशमन कर्मचारी













