पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकहाती सत्ता मिळवत शहराच्या राजकारणावर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. १२८ सदस्यांच्या महापालिकेत भाजपचे सर्वाधिक ८४ नगरसेवक निवडून आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ३७, शिवसेना (शिंदे) पक्षाला ६, तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.
या निवडणुकीतील एक महत्त्वाचा राजकीय पैलू म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या तब्बल ७६ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. याउलट भाजपच्या ३७ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामध्ये भाजपचे चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार अवघ्या ५०० मतांच्या फरकाने पराभूत झाले, ज्यामुळे अनेक प्रभागांत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, भाजपच्या संघटनात्मक ताकदीसमोर राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पाच, अपक्ष तीन, मनसे दोन आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
भाजपचे दहा प्रभागांत संपूर्ण पॅनल विजयी
भाजपने तब्बल १० प्रभागांत संपूर्ण पॅनल विजयी करून आपली ताकद अधोरेखित केली. यामध्ये मोशी-बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली-डुडुळगाव, दिघी-बोपखेल, धावडेवस्ती-सद्गुरूनगर, संभाजीनगर, कृष्णानगर-घरकुल, निगडी-प्राधिकरण, पुनावळे-ताथवडे, पिंपळे निलख-कासपटेवस्ती आणि पिंपळे गुरव-जवळकरनगर या प्रभागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भोसरी विधानसभेत पाच, चिंचवडमध्ये तीन आणि पिंपरीत दोन पॅनल भाजपने जिंकले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मात्र नेहरूनगर-खराळवाडी, संत तुकारामनगर-कासारवाडी आणि पिंपरीगाव-जिजामाता या तीन प्रभागांत संपूर्ण पॅनल विजयी करून पिंपरी विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व दाखवले.
महापालिकेत ६४ महिला – ६४ पुरुष
५० टक्के महिला आरक्षणामुळे सभागृहात ६४ महिला आणि ६४ पुरुष नगरसेवक असणार आहेत. काही प्रभागांत महिलांनी पुरुष उमेदवारांना थेट आव्हान दिले, मात्र त्या जागांवर महिलांचा पराभव झाल्याने लिंग समतोल कायम राहिला.
‘जायंट किलर’ ठरले अनेक उमेदवार
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का देणारे निकाल लागले. इंद्रायणीनगरमध्ये भाजपचे डॉ. सुहास कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांचा पराभव केला. सांगवी गावठाणात राष्ट्रवादीच्या उज्ज्वला ढोरे यांनी भाजपच्या माजी महापौर उषा ढोरे यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ ठरल्या. तसेच पिंपरीगावमध्ये प्रियंका कुदळे, संत तुकारामनगरमध्ये वर्षा जगताप यांनी भाजपच्या दिग्गज महिला नेत्यांना पराभूत केले.
नितीन काळजे सर्वाधिक मतांनी विजयी
भाजपचे माजी महापौर नितीन काळजे हे या निवडणुकीतील सर्वाधिक मतांनी विजयी उमेदवार ठरले. त्यांनी ३०,९९२ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रकाश आल्हाट यांचा १९,६५३ मतांनी पराभव केला. दुसरीकडे भाजपच्या जयश्री गावडे यांना अवघ्या २१ मतांनी पराभव स्वीकारावा लागला, ही निवडणुकीतील सर्वात अटीतटीची लढत ठरली.
एकूणच, पिंपरी-चिंचवडच्या या निकालाने भाजपचे शहरावरील वर्चस्व अधोरेखित केले असून, राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा ठरला.
















