ताज्या घडामोडीपिंपरी

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती घेण्यासाठी चार उपायुक्तांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक

नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार याद्यांवरील येणाऱ्या सूचना व हरकतींच्या अनुषंगाने प्रगणकांचे प्रशिक्षण संपन्न

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवरील हरकती व सूचनांवर छाननी, सुनावणी व निर्णय घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय चार उपायुक्तांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील २०५-चिंचवड विधानसभा, २०६-पिंपरी विधानसभा, २०७-भोसरी विधानसभा आणि २०३-भोर विधानसभा मतदारसंघ (ताथवडे गाव) या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवरील हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये ‘अ’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उपायुक्त सिताराम बहुरे, ‘ब’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उपायुक्त राजेश आगळे, ‘ड’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उपायुक्त निलेश भदाणे आणि ‘क’ व ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

*प्रगणकांना देण्यात आले प्रशिक्षण*

प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या नागरिकांच्या हरकती व सूचनांवरील कार्यवाहीच्या कामकाजासंदर्भात आज प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहातील छोटे सभागृह येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी मतदार यादीवरील हरकती व सूचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत प्रगणकांना प्रशिक्षण दिले.

यावेळी निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त तथा सहाय्यक प्राधिकृत अधिकारी किरणकुमार मोरे, नगर सचिव मुकेश कोळप, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, निलेश भदाणे, सिताराम बहुरे, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, तानाजी नरळे, अश्विनी गायकवाड, किशोर नन्नवरे, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, यांच्यासह महापालिकेचे निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि प्रगणक उपस्थित होते.

प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना नोंदविणे, हरकती व सूचनांवरील सुधारणा/दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही कशी करावी आदीबाबत यावेळी प्रगणकांना मार्गदर्शन करण्यात आले.
…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button