चौथीपासून पदव्युत्तरपर्यंत; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात शिक्षणाची विविध ‘इयत्ता’

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या सभागृहाची रचना केवळ राजकीय नव्हे, तर शैक्षणिकदृष्ट्याही लक्षवेधी ठरत आहे. १२८ नगरसेवकांच्या या सभागृहात चौथी पासपासून ते पदव्युत्तर आणि व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या प्रतिनिधींचा समावेश असून, लोकशाहीतील व्यापक प्रतिनिधित्वाचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.
महापालिकेच्या कारभाराची सूत्रे आता विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकांच्या हाती आली आहेत. उपलब्ध माहितीनुसार, चौथी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलेले १४ नगरसेवक, तर आठवी ते नववीपर्यंत शिकलेले १८ नगरसेवक सभागृहात आहेत. दहावी व बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असून, दहावी पास २७ आणि बारावी पास २१ असे एकूण ४८ नगरसेवक या गटात येतात.
उच्चशिक्षण घेतलेल्या नगरसेवकांचाही सहभाग लक्षणीय आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पदवीधर नगरसेवकांची संख्या ३३ असून, एमए, एमकॉम, एमएस्सी, एमबीए, एमसीए अशा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची संख्या ८ आहे. विशेष बाब म्हणजे नव्या सभागृहात डॉक्टर, वकील, अभियंते आणि शिक्षक अशा व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची उपस्थितीही ठळक आहे. यामध्ये एक डॉक्टर, तीन वकील, पाच अभियंते आणि तीन शिक्षकांचा समावेश आहे.
या शैक्षणिक वैविध्यामुळे आरोग्य, कायदा, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विकासकामांवर चर्चेदरम्यान तज्ज्ञ मते मांडली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच दहावीपासून पदवीधर नगरसेवकांची संख्या तब्बल ८१ असल्याने, अनुभवासोबत शिक्षणाचा समतोल साधणारे हे सभागृह शहराच्या कारभाराला नवी दिशा देईल, असा राजकीय वर्तुळात सूर आहे.




















