Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच प्रभाग क्रमांक १८ मध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप झाला आहे. भाजपच्या उमेदवार अपर्णा डोके यांचे पती निलेश डोके यांनी मतदान करतानाचा व्हिडिओ आणि फोटो थेट फेसबुकवर अपलोड केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.

सर्वसामान्य मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही निलेश डोके यांनी मोबाईल मतदान केंद्रात नेला. यामुळे मतदान अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच बूथ प्रमुखांच्या कामगिरीवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. लोकशाहीचा कणा असलेली मतदान प्रक्रिया ही गुप्त आणि निर्भय असणे अपेक्षित असताना, भाजप उमेदवाराच्या पतीकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे हा केवळ आचारसंहिता भंगच नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवला आहे का? की हा प्रकार सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तीचा असल्याने दुर्लक्षित केला जाणार, असा सवाल आता शहरात चर्चेचा विषय ठरत होता.

दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version