मतदार यादीतील गोंधळाची थेट दखल; शरद पवारांकडे नागरिकांचे निवेदन, तात्काळ दुरुस्तीची मागणी”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बारामती आणि इंदापूर मतदारसंघातील मतदार यादीतील गंभीर त्रुटी, नागरिकांची नावे विनाकारण वगळणे तसेच स्थलांतराच्या चुकीच्या नोंदींमुळे सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीची दखल घेत आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांची विशेष भेट घेण्यात आली.
या प्रतिनिधी मंडळात पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह मतदार यादीतून नावे वगळलेल्या राबिया शेख आणि युनूस शेख यांचा समावेश होता. शहरातील मतदार नोंदणी प्रक्रियेत दिसून येणारी गंभीर अनियमितता, नव्या नोंदणीतील विलंब तसेच नागरिकांची नावे अचानक इतर मतदारसंघात टाकल्याची प्रकरणे याबाबत सविस्तर माहिती पवार साहेबांसमोर मांडण्यात आली.
नेत्यांनी या प्रकरणाचा गंभीरपणे विचार करून संबंधित प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्तीची आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मतदारांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तर इम्रान शेख म्हणाले, “इच्छुक उमेदवारांचे किंवा नागरिकांचे नावे विनामागणी इतर मतदारसंघात हलवणे ही लोकशाहीची सरळसरळ पायमल्ली आहे. मतदानाचा अधिकार हिरावून घेणाऱ्या जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी.”
मतदार यादीतील त्रुटीमुळे अनेक नागरिकांना मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहावे लागत असल्याने हे प्रकरण थेट शरद पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून, येत्या काळात या प्रकरणात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















