ताज्या घडामोडीपिंपरी

मतदार याद्यांतील गोंधळाची ‘दहा हजार’ नोंद! आगामी निवडणुकीपूर्वी महापालिका प्रशासनावर राजकीय तगादा वाढला”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्यांवर नागरिकांचा अक्षरशः आक्रोश उसळला आहे. बुधवारी मुदतीच्या अखेरच्या दिवशी तब्बल ३,२१६ हरकती, तर एकूण १०,२८८ हरकती व सूचनांचा पाऊस प्रशासनावर पडला आहे. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत १४ पट अधिक हरकती दाखल होत असल्याने मतदार याद्यांतील गोंधळाचे राजकारण चांगलेच तापले आहे.

शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमधील मिळून १७ लाख १३ हजार ८९१ मतदारांच्या याद्या विधानसभेच्या आकडेवारीवर आधारित तयार करण्यात आल्या. चिंचवड मतदारसंघातील सर्वाधिक ६.७६ लाख, तर भोसरीतील ६.२४ लाख, पिंपरीतील ३.९९ लाख, तसेच भोर मतदारसंघातील ताथवडे परिसरातील १३ हजारांहून अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला.

२० नोव्हेंबरला प्राथमिक याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती घेण्याची तरतूद होती. मात्र प्रभागनिहाय याद्यांतील तफावती, नावे गायब होणे, पत्ते चुकीचे असणे, अचानक वाढलेले मतदार, काही प्रभागांतील संशयित फेरफार यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दबाव वाढताच मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली.

हरकतींचा आकडा प्रचंड — कोणत्या कार्यालयात किती?

क्षेत्रीय कार्यालय क : २,४६१

फ : १,६६८

ड : १,४८०

ग : १,३४५

ब : १,३०६

ह : ७८०

इ : ४३०

मतदार यादी कक्ष : १४३
महापालिकेने स्वतःहून (सुमोटो) २७५ हरकती नोंदवल्या असून, दुबार नावांच्या २३ तक्रारी मिळाल्या आहेत.

९२ हजार दुबार मतदारांचा ‘स्फोट’ — राजकीय पक्षांचे कान टवकारले!

प्रभागनिहाय वर्गीकरण झाल्यानंतर प्रशासनाला तब्बल ९२,६६४ दुबार मतदार आढळले. अनेक प्रभागांमध्ये एकाच नावाचे मोठ्या प्रमाणावर मतदार असल्याने राजकीय पक्षांनी यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुबार नावांना दोन स्टार लावून तीच व्यक्ती असल्यास हमीपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर चांगलाच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.

निवडणूक विभागाकडून धावपळ — ५०% सुनावणी पूर्ण

हरकतींची सुनावणी करण्यासाठी ८ उपायुक्त, ८ क्षेत्रीय अधिकारी व प्रशासकीय पथक नेमण्यात आले. सुनावणी जलदगतीने होत असून सुमारे ५० टक्के हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

१० डिसेंबरपर्यंत सर्व हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button