प्रभागनिहाय मतदारयादीतून भडकले राजकीय युद्ध!” नगरसेवकांसह कुटुंबेच ‘गायब’!”
मतदारयादीतून लक्ष्य साधले? प्रभाग बदलून निवडणूक समीकरणे हलली!”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत अभूतपूर्व गोंधळ उफाळून आला आहे. शहरातील अनेक माजी नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबीयांची नावे मूळ प्रभागातून गायब होऊन असंबंधित प्रभागात टाकण्यात आली आहेत. शेकडो घरांतील संपूर्ण कुटुंबांची नावेही दुसऱ्याच प्रभागात दाखल झाल्याचे दिसत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचे नाव थेट चिखली (प्रभाग १) मध्ये टाकण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर १,२६१ मतदारांना एकाचवेळी चिखली प्रभागात हलवण्यात आले आहे. वर्षानुवर्षे तळवड्यात वास्तव्यास असलेल्या शेकडो मतदारांचे असे स्थलांतर केल्याने प्रभागात गोंधळ उडाला आहे.
याचप्रमाणे, मागील निवडणुकीतील उमेदवार योगिता रणसुभे यांच्या नावासह मोरेवस्तीतील मोठ्या गटातील मतदारांचे संपूर्ण बुथच प्रभाग ११ मध्ये हलवण्यात आले आहेत. पूर्णानगर, कृष्णानगर आणि घरकुल भागात शेकडो मतदार अचानकपणे ‘शिफ्ट’ झाल्याने अनेकांना स्वतःचे मतच मिळणार नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे.
गुरुवार (२० नोव्हेंबर) रोजी प्रभागनिहाय मतदारयादी जाहीर झाल्यानंतर शहरातील किमान ३–४ प्रभागांत मोठे घोळ समोर आले. अनेक प्रभागांमध्ये मतदार गायब, प्रभाग बदल, संपूर्ण सोसायटींचे स्थलांतर असे गंभीर प्रकार आढळत आहेत.
स्थानीय नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारांचे स्थलांतर चूक आहे की जाणूनबुजून आखलेला राजकीय डावपेच?” असा थेट सवाल विचारला जात आहे.
“राजकीय सुडाचा भाग” — माजी नगरसेवक भालेकर यांचा आरोप
तळवडेच्या माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी थेट प्रशासनावर प्रखर टीका केली.
“माझेच नाव माझ्या प्रभागात नाही! हजारो मतदारांना दुसरीकडे हलवणे म्हणजे राजकीय सुड. प्रशासन राजकारण्यांच्या तालावर नाचत आहे,” असा त्यांनी आरोप केला.
निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नप्रभागरचना व मतदारयादीतील अशा भोंगळ व्यवस्थेमुळे निवडणूक निष्पक्षतेवर प्रश्नउमेदवारांच्या जिंकण्या–हारण्यावर थेट परिणाम
नागरिकांची मोठी फसवणूकअसे गंभीर मुद्दे निर्माण झाले आहेत. तक्रारींनुसार या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.




















