ताज्या घडामोडीपिंपरी
“अनुसूचित जाती राखीव प्रभाग ९ मध्ये सर्वपक्षीय बैठक — स्थानिकांना प्राधान्याचा ठाम संकल्प”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर–खराळवाडी परिसरातील समविचारी तसेच आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ (अनुसूचित जाती राखीव) मध्ये रस असलेल्या सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडली. बैठकीची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आणि त्यानंतर प्रभागातील सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल चर्चा करण्यात आली.
गेल्या १८ वर्षांच्या काळात गांधीनगर परिसराला स्थानिक नगरसेवक मिळालेला नसल्याने, या वेळी अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातून स्थानिक उमेदवार उभा करण्याची संधी मिळत असल्याचा मुद्दा उपस्थितांमध्ये विशेषत्वाने अधोरेखित झाला. प्रभागात पुन्हा एकदा स्थानिक नेतृत्वाला पुढे येण्याची संधी मिळत असल्याने सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मनोगतातून तीव्र भावना व्यक्त केली. विविध पक्षातील उमेदवारांनी आपल्या पक्षांकडे तिकीटाची मागणी तीव्रपणे करावी आणि स्थानिक व्यक्तीलाच तिकीट मिळावे या मताची एकमुखी पुष्टी बैठकीतून झाली.
प्रभागातील पिण्याचे पाणी, शौचालयांची कमतरता, अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, दिवाबत्ती व्यवस्थेतील त्रुटी, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, विधवा योजना, निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर अनेक सामाजिक प्रश्न –शासकीय योजना नागरिकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचण्याची कारणे याविषयी उपस्थित सर्वांनी चिंतन केले. स्थानिक उमेदवार निवडून आल्यास प्रभागातील अनेक दीर्घकालीन प्रश्न मिटू शकतील आणि विकासाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून गांधीनगर झोपडपट्टीत उभ्या राहिलेल्या सामाजिक, नागरी आणि प्रशासनिक समस्या सोडवण्यासाठी स्थानिक नेतृत्वाची गरज अत्यंत महत्त्वाची असल्याचेही मत व्यक्त झाले.
बैठकीत एक महत्त्वाचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाने स्थानिक उमेदवारालाच तिकीट दिले पाहिजे, आणि जर कोणत्याही पक्षाने बाहेरील उमेदवाराला तिकीट दिले तर त्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय सर्वांनी दृढपणे मान्य केला. प्रभागातील मतदारांची एकता टिकवून ठेवणे, स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देणे, बाहेरील उमेदवारांवरील अवलंबित्व कमी करणे आणि आपल्या परिसराच्या विकासाला न्याय देणारा उमेदवार निवडणे हेच सर्वांचे प्रमुख ध्येय असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे आमिष, प्रलोभन, धन–दंड–भेद, धमकी किंवा मतदारांना फितूर करण्याचे प्रयत्न झाल्यास संबंधित व्यक्ती किंवा पक्षाविरुद्ध निवडणूक आयोग किंवा इतर कायदेशीर प्रशासकीय यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात येईल, याची स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आली. स्वच्छ, पारदर्शक आणि प्रामाणिक निवडणुकीची प्रक्रिया राखण्याचा संकल्प उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.
बैठकीत अॅड. बी. के. कांबळे, काँग्रेस पक्षाचे अॅड. उमेश खंदारे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अॅड. धम्मराज साळवे,RPI चे दिलीप साळवे, कष्टकरी नेते बाबा कांबळे, RPI चे अजीज शेख, प्रल्हाद कांबळे, भाजपा तर्फे अॅड. दत्ता झुळूक,वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत बोचकुरे, अजय शेरखाने, दीपक म्हेत्रे, निलेश काळे आणि गिरीश साबळे हे सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. तसेच लक्ष्मण कांबळे, हिराचंद जाधव, गणेश साळुंखे, धम्मा आचलखांब, सम्राट गायकवाड, राजन गुंजाळ, मनोज गजभार (लेणी संवर्धक) तसेच रविभाऊ कांबळे यांसारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मान्यवरही उपस्थित राहून त्यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले.
सर्व उपस्थितांनी एकमुखी ठराव नोंदवला की प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर–खराळवाडी येथून स्थानिक उमेदवारालाच तिकीट मिळाले पाहिजे आणि स्थानिक उमेदवारालाच एकत्रित पाठिंबा देऊन निवडून आणले जाईल. अन्यथा कोणत्याही बाहेरील उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय कायम राहील. या बैठकीमुळे प्रभागातील नागरिकांची एकजूट, आत्मविश्वास आणि स्थानिक नेतृत्वाबद्दलची अपेक्षा याला नवचैतन्य लाभले आहे.




















