ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

“इच्छुकांचा ऑनलाईन शो टॉप गिअरमध्ये; पोस्ट-युद्धातच तापली निवडणुकीची हवा!”

Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीनंतर शहरात खऱ्या अर्थाने डिजिटल निवडणुकीची सरगर्मी वाढली आहे. इच्छुकांनी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याआधीच सोशल मीडियावर आपला ‘दबदबा’ दाखवण्यास सुरुवात केली असून, फेसबुक-इंस्टाग्रामवर “मीच भावी नगरसेवक”, “यंदा माझा नंबर पक्का”, “जनतेच्या मनातील उमेदवार” अशा धडाकेबाज पोस्टचा महापूर पाहायला मिळतो आहे.

आरक्षणामुळे प्रभागांचे चित्र स्पष्ट होताच अनेकांनी आपापले ‘सेफ’ प्रभाग ठरवून तयारी सुरू केली आहे. अनेक वर्षे शांत बसलेले किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही क्वचितच दिसणारे काही आजी-माजी पदाधिकारी अचानक सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यांच्या ‘कमबॅक’ पोस्टने पाठीराख्यांचा उत्साहही एकदम शिगेला पोहोचला आहे.

नागरिकांच्या दारोदारी पोहोचण्याऐवजी एकाचवेळी हजारोंपर्यंत पोहोचणारे सोशल मीडिया हे सध्या इच्छुकांचे पहिले आणि सर्वात प्रभावी राजकीय शस्त्र बनले आहे. त्यामुळे प्रचाराची पहिली फेरी पूर्णपणे ऑनलाईन रणांगणातच रंगत आहे. पोस्ट-वॉर, कॅप्शन कट्टे आणि अप्रत्यक्ष टोमण्यांची देवाणघेवाण यामुळे वातावरण तापले असून प्रत्यक्ष निवडणूक अजून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र ‘अॅक्शन’ जोमात आहे.

विशेष म्हणजे, शहरातील अनेक कुटुंबांमध्येच अनेक जण इच्छुक असल्याने घराघरातच ‘राजकीय निवडणूक समित्या’ बसू लागल्या आहेत. काका–पुतणे, सख्खे-चुलत भाऊ, मामा–भाचे अशा नात्यांतील स्पर्धेमुळे गावकी-भावकीमध्येही चर्चांचा उहापोह सुरू आहे. “गेल्यावेळी आमच्या घरातून निवडणूक झाली, यंदा तुमच्या माणसाला साथ द्या” अशा चर्चाही जोरात रंगताना दिसत आहेत.

आरक्षणानंतर इच्छुकांमध्ये निर्माण झालेली ही सोशल मीडिया धामधूम पाहता, पिंपरी-चिंचवडची निवडणूक मोहीम प्रत्यक्ष रस्त्यांवर सुरु होण्याआधीच ऑनलाइन पूर्ण उफाळून आली असल्याचे स्पष्ट होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button