ताज्या घडामोडीपिंपरी

पुण्यात उच्च न्यायालय खंडपीठाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचा पाठिंबा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्याची मागणी गेल्या ४५ वर्षापासून सुरू आहे, विधानसभेत याबाबत ठरावही मंजूर झाला आहे. पुण्यामध्ये अनेक सरकारी कार्यालय आणि प्राधिकरणांचे अपिलेट बेंच म्हणजेच अपील न्यायपीठ कार्यरत आहेत, तसेच मुंबईनंतर पुणे हे सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र असल्याने येथील औद्योगिक विकासाची संबंधित अनेक कायदेशीर बाबी आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांपैकी बहुसंख्य खटले पुणे जिल्ह्यातून येतात त्यामुळे पुण्यात खंडपीठ झाल्यास पक्षकारांना मोठा फायदा होईल आणि मुंबई उच्च न्यायालयावरील कामाचा ताणही कमी होईल. ही केवळ वकिलांचीच नव्हे तर पुण्यातील लाखो सामान्य नागरिकांची अनेक वर्षापासून ची मागणी आहे. परंतु, यावर अद्याप कोणताही ठोस कार्यवाही झाली नाही.

पुण्यात खंडपीठ नसल्यामुळे वकीलवर्ग आणि पक्षकारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, प्रत्येक सुनावणीसाठी मुंबईला जाणे म्हणजे वेळेचा अपव्य, प्रचंड प्रवास खर्च आणि मानसिक ताण, अत्यंत महत्त्वाच्या अशा या मागणीसाठी सर्वांच्या एकजुटीची गरज आहे. विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र आणि एक महत्त्वाचे औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याला न्यायव्यवस्थेच्या या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. त्यामुळे सर्वांसाठी समान आणि सहज न्याय उपलब्ध व्हावा या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनच्या वतीने पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा सुरू करण्यात आलेला आहे.

या मागणीस पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड यांना पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी अधिकृत समर्थनपत्र सुपूर्द करण्यात केले. यावेळी दौंड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत गिरमकर, पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. सुरेखा भोसले, सचिव ॲड. पृथ्वीराज थोरात, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲड. उमेश खंदारे, ऑडिटर ॲड. शंकर घंगाळे, सदस्य ॲड. धम्मराज साळवे आदि उपस्थित होते.

या वेळी बोलताना पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे म्हणाले की, “पुणे जिल्ह्यात न्यायालयीन कामकाजाची प्रचंड वाढ झालेली असून नागपूर, औरंगाबाद, गोवा आणि कोल्हापूर ठिकाणी खंडपीठ असताना पुण्यासारख्या मोठ्या शहराला खंडपीठ मिळणे गरजेचे झाले असल्याने सर्व वकिलांनी आणि नागरी संस्थांनी एकत्र येऊन हा लढा मजबूत केला आहे.”

या पुढाकारामुळे खंडपीठाच्या मागणीस आणखी बळ मिळणार असून, भविष्यात यासंदर्भात व्यापक जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button