महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकला बदली,नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नेमणूक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आली असून, त्यांना नाशिक येथील कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश राज्य शासनाने आज सायंकाळी जारी केले.
दरम्यान, पिंपरी चिंचवड मेट्रोचे मुख्य अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार तात्पुरता सोपविण्यात आला आहे.
शेखर सिंह यांची १४ ऑगस्ट २०२२ रोजी सातारा जिल्हाधिकारी पदावरून थेट पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
शेखर सिंह यांच्या कार्यकाळात प्रशासनिक पातळीवर अनेक निर्णय घेतले गेले; मात्र त्यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराचे आरोप, प्रशासकीय अनियमितता आणि विकासकामांतील अपारदर्शकता यावर विरोधकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले.
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना विरोधकांकडून त्यांची बदली करण्याची मागणीही जोर धरू लागली होती. अखेर शासनाने आज आदेश काढून सिंह यांची बदली निश्चित केली.













