ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महापालिका राबवणार ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छतेचा महोत्सव

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वप्न पाहिलेल्या स्वच्छ भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत पिंपरी चिंचवड महापालिकेकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेला सामाजिक चळवळीचे रूप देणे, नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

महापालिकेने या अभियानांतर्गत १६ दिवसांच्या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण, लोकसहभाग वाढवणारे कार्यक्रम आखले असून त्यातून नागरिकांना प्रत्यक्ष कृतीतून सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमांमध्ये नागरिक, व्यापारी वर्ग, स्वयंसेवी संस्था, महिला गट व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अभियानातील महत्त्वाचे उपक्रम

*सार्वजनिक जागांची स्वच्छता मोहीम :* या मोहीमेत मुख्य रस्ते, बाजारपेठा, बसस्थानके, उद्याने व जलाशय परिसराची स्वच्छता, सफाई मित्रांसाठी आरोग्य तपासणी, सुरक्षा साधनांचे वितरण व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

*स्वच्छ हरित महोत्सव :* या महोत्सवांतर्गत पर्यावरणपूरक उत्पादने, वृक्षारोपण उपक्रम, हरित जीवनशैलीवरील कार्यशाळा व प्रदर्शन घेण्यात येईल.

*प्लास्टिक प्रदूषणविरोधी जागरूकता :* या उपक्रमांतर्गत सिंगल-यूज प्लास्टिक टाळण्यासाठी पर्यायी उपाययोजनांची माहिती देण्यात येईल.

*घरोघरी जनजागृती :* ओला-सुका कचरा वर्गीकरण, घरगुती कंपोस्टिंग, वेस्ट सेग्रीगेशन याविषयी प्रात्यक्षिके व माहितीपत्रके आदींबाबत नागरिकांना माहिती दिली जाईल.

*स्वच्छता रॅली :* विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट व नागरिकांच्या सहभागातून भव्य रॅलीचे आयोजन करणे.

*आर.आर.आर. (Reduce–Reuse–Recycle) जनजागृती :* घरातील उपयोगी पण वापरात नसणाऱ्या वस्तू आर.आर.आर. सेंटरमध्ये जमा करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

*वेस्ट आर्ट उपक्रम :* कचऱ्यातून कलाकृती तयार करून “कचरा हा संसाधन आहे” हा संदेश पोहोचविणे.

स्वच्छता ही सेवा अभियान हा केवळ उपक्रम नसून यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाने सक्रीय सहभागी होणे आवश्यक आहे. स्वच्छतेतून आरोग्य, पर्यावरण आणि विकासाचा पाया मजबूत होतो. ‘स्वच्छतेचा संकल्प’ घेऊन पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका राबवत असलेल्या अशा विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

आपले शहर, आपला परिसर स्वच्छ ठेवणे हीच खरी सेवा आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन पिंपरी चिंचवडला स्वच्छतेचे आदर्श शहर बनवू या.

– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button