ताज्या घडामोडीपिंपरी

दिवाळीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छतेसाठी विशेष मोहीम

चार दिवसांत तब्बल ५ हजार ६५८ टन कचरा संकलित

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिवाळी काळात कचरा संकलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांच्या काळात तब्बल ५ हजार ६५८ टन कचरा संकलित केला आहे.

दिवाळीच्या काळात घराघरात करण्यात येणारी साफसफाई, बाजारपेठांतील गर्दी, फटाक्यांचा कचरा आणि सजावटीसाठी वापरले जाणारे साहित्य यामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली कचरा संकलनाचे विशेष नियोजन केले होते.

कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३२ प्रभागांमध्ये स्वच्छता कर्मचारी, घंटागाड्या आणि वाहने २४ तास कार्यरत होती. या काळात दररोज सरासरी १ हजार ४०० टनांहून अधिक कचरा संकलित करण्यात आला. फटाक्यांच्या अवशेषांचा स्वतंत्रपणे कचरा म्हणून निपटारा करण्यात आला. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

घरगुती साफसफाईमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढविण्यात आली होती. नागरिकांनी घरगुती कचरा ओला व सुका असा वेगळा करून द्यावा, तसेच वापरात नसलेल्या परंतु सुस्थितीत असलेल्या वस्तू महापालिकेच्या आर.आर.आर. केंद्रात जमा कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले होते. त्यास देखील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

विशेष साप्ताहिक स्वच्छता मोहिमेचे नियोजन

दिवाळीनंतरही शहरात स्वच्छतेचा संकल्प कायम ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष साप्ताहिक स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणे, मंदिर परिसर, बाजारपेठा आणि फटाक्यांच्या विक्री झालेल्या भागांमध्ये अतिरिक्त स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या काळात कचरा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याच्या व्यवस्थापनासाठी आरोग्य विभागाने नियोजन करून कार्यक्षम यंत्रणा उभारली होती. क्षेत्रीय कार्यालयांतील समन्वय, तातडीने वाहतूक व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली. नागरिकांचा स्वच्छतेकडे वाढलेला कल ही महापालिकेसाठी सकारात्मक बाब आहे.
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button