पिंपरी चिंचवड शहराने दिलेल्या अतोनात प्रेमाचा कायम ऋणी; आयुक्त शेखर सिंह यांची भावना

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर विकासाचे रोल मॉडेल आहे. या शहराने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून या शहरात विकासाभिमुख उपक्रम आणि प्रकल्प राबवताना शहरवासियांनी दिलेली साथ आणि केलेले सहकार्य माझ्या या शहरातील प्रशासकीय कारकिर्दीमधील विशेष भाग आहे. या शहरात काम करताना येथील संस्कृतीशी एकरूप झालो. शहरवासियांनी दिलेले अतोनात प्रेम माझ्या जीवनाचा अमूल्य ठेवा असून या शहराचा मी कायम ऋणी राहीन, अशा गहिवरलेल्या शब्दांत आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नाशिकच्या कुंभमेळा आयुक्तपदी शासनाने शेखर सिंह यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये शहरवासियांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये शहराचे प्रतिक असलेले भक्ती-शक्ती समूहशिल्प आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहातील छायाचित्रांची प्रतिमा भेट म्हणून देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सन्मानाला उत्तर देताना शेखर सिंह बोलत होते.
आमदार उमा खापरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह अभिजात मराठी भाषा सप्ताह नियोजनातील प्रमुख संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यामध्ये महापालिका सह आयुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, पोलीस उपायुक्त बापू बांगर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजेंद्र लाखे, माजी नगरसेवक केशव घोळवे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे निर्माते-दिग्दर्शक अशोक हांडे आदी मंचावर उपस्थित होते.
रसिकांच्या उपस्थितीने हाऊलफुल्ल झालेल्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अशोक हांडे निर्मित-दिग्दर्शित मराठी बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अभिजात मराठी भाषा सप्ताहात करण्यात आले होते. यावेळी हांडे यांचा सन्मान आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शहरवासियांच्या वतीने शेखर सिंह यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानाला उत्तर देताना आयुक्त सिंह बोलत होते.
यावेळी आमदार उमा खापरे यांनी शेखर सिंह यांना शहरवासियांच्या वतीने शुभेच्छा देताना सांगितले की, ‘पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदावर कार्यरत असताना शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड शहर विकासाच्या दृष्टीने झोकून देऊन काम केले. सिंह यांच्या माध्यमातून शहराला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आयुक्त लाभले. ते नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा व्यवस्थापनामध्ये देखील उत्तम कामगिरी बजावतील असा विश्वास आहे. त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत.’
भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘शहरातील भौतिक सुविधा आणि प्रकल्प राबवण्यासाठी आयुक्त सिंह यांनी काम केले, त्याचबरोबर या शहराच्या सांस्कृतिक चळवळीला देखील त्यांनी चालना दिली. अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी मराठीच्या प्रचार प्रसार चळवळीला प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या पुढाकाराने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करून विविध भव्यदिव्य कार्यक्रम होत आहेत. नागरिकांचा देखील त्याला उदंड प्रतिसाद आहे. शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाचे आयोजन आयुक्त शेखर सिंह यांच्या सहकार्याने यशस्वी झाले. या सांस्कृतिक लोकचळवळीला गतीमान करण्यासाठी आयुक्त म्हणून शेखर सिंह यांचे काम शहराच्या कायम स्मरणात राहील. सिंह यांना भावी प्रशासकीय वाटचालीसाठी शहरातील सर्व कलारसिक, कलाप्रेमी, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळ आणि मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो.’
या सन्मानाला उत्तर देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड शहर हे वारकरी संप्रदाय आणि संस्कृतीचे माहेरघर आहे. या शहराशी माझे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. या शहराने मला प्रेमासोबत आयुष्यातील सुखद आणि आनंददायी आठवणी दिल्या आहेत. हे शहर माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील. पिंपरी चिंचवड ही संतांची आणि वारकरी संप्रदायाची भूमी आहे. संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा या शहरातून मार्गक्रमीत होत असताना मला वारकऱ्यांची सेवा करण्याचे सौभाग्य मिळाले. या पालखी सोहळ्यात मला सहभागी होता आले, याचे मनस्वी समाधान आहे. महापालिका आयुक्त म्हणून काम करत असताना शहर विकास प्रक्रियेचा भाग बनता आले. विकासात अग्रेसर असलेल्या या शहराने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून इतरांसाठी रोल मॉडेल उभे केले आहे. मी या शहराच्या कायम ऋणात असून शहराप्रती माझ्या भावना व्यक्त करताना आणि शहरातील नागरिकांनी दिलेल्या प्रेमाला शब्दात मांडताना भावना दाटून आल्यामुळे मी त्या शब्दात मांडू शकत नसलो तरी माझे या शहरासोबत निर्माण झालेले नाते मी कायम जोपासत राहील, अशी भावना आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, संतांची भूमी असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचे आणि सिंहस्थ भरतो त्या नाशिक-त्र्यंबकेश्वरचे नाते विषद केले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर येथील समाधीचा संदर्भ दिला. ‘पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती-शक्तीचा संदेश घेऊन संतांच्या भूमीतून आयुक्त शेखर सिंह हे आता अध्यात्माच्या भूमीत प्रशासकीय कर्तव्य बजावण्यासाठी जात आहेत,’ असे त्यांनी नमूद केले.
आयुक्त सिंह यांनी सुलेखन प्रदर्शनाला दिली भेट
अक्षरलावण्य संस्थेचे नागराज मलशेट्टी यांनी अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये सहभाग घेत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनात मराठी हस्ताक्षर सुलेखन प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाला आयुक्त शेखर सिंह यांनी भेट देत सविस्तर माहिती घेतली. या प्रदर्शनासोबतच अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शन व राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे आयुक्त सिंह यांनी कौतुक केले.
……













