साडे चारशेपेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेत सहभाग
कचरा विलगीकरणसह स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर देखील दिला जातोय भर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये देशात सातवा व राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महापालिकेकडून राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम, कचरा विलगीकरण, स्वच्छतेबाबत जनजागृती, आर.आर.आर (रिड्यूस–रियुज–रिसायकल) प्रकल्प तसेच शून्य कचरा प्रकल्प अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेत उल्लेखनीय बदल घडून आला आहे. या सर्व उपक्रमांच्या यशामागे नागरिकांचा सहभाग जितका महत्त्वाचा आहे, तितकाच सहभाग स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आहे. यामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांची संख्या साडेचारशेपेक्षा जास्त असून पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छतेची धुरा सांभाळण्यामध्ये या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने “स्वच्छ शहर, सुंदर शहर” हे ध्येय गाठण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली शहरात विविध अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार मोठा आहे. यामध्ये आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३२ प्रभाग असलेल्या या शहराची स्वच्छतेची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. या महिला कर्मचाऱ्यांकडून सातत्याने नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यास प्राधान्य दिले जाते.
निरीक्षकपदावर आठ महिला कार्यरत
पिंपरी चिंचवड महापालिकेत आरोग्य विभागात महिला आरोग्य निरीक्षक संतोषी कदम, रश्मी तुंडलवार, स्नेहल सोनवणे, स्नेहल सुकटे, रुपाली साळवे, स्नेहा चांदणे, कोमल फर्डे आणि मलेरिया निरीक्षक रुपाली शेटे या निरीक्षकांनी आपल्या कार्यातून नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांना स्वच्छतेची सवय लावण्याचे मोठे काम करीत आहेत. दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत कचरा संकलन, नालेसफाई, तसेच स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना सहभागी करून घेणे, या सर्व गोष्टींचा भार त्या समर्थपणे उचलत आहेत. स्थानिक स्तरावर कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती असो वा परिसरातील स्वच्छतेवर नियमित देखरेख असो, या महिला निरीक्षकांचा सहभाग प्रेरणादायी आहे. नागरिकांना जागरूक करण्यासाठी हे निरीक्षक अनेकदा घरोघरी जनजागृती मोहिम राबवतात. तर कधी शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगतात. यासर्व बाबींचा पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर ठरण्यात मोठा वाटा आहे.
शहरातील स्वच्छतेसाठी आमच्या आरोग्य निरीक्षकांचा व महिला-पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांचा एकत्रित प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. विशेषतः आरोग्य निरीक्षकांनी प्रभाग स्तरावर सातत्याने जनजागृती करून आणि देखरेख ठेवून स्वच्छतेच्या उपक्रमांना गती दिली आहे. नागरिकांनीही या प्रयत्नांना प्रतिसाद दिल्यास आपले शहर देशात अग्रेसर होईल.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
पिंपरी चिंचवडच्या स्वच्छतेच्या यशामागे महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा तितकाच मोठा वाटा आहे. यामध्ये महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेमध्ये योगदान देताना दाखवलेली निष्ठा, जबाबदारी आणि कार्यक्षमता कौतुकास्पद आहे.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
संपूर्ण शहरात दररोज स्वच्छता ठेवणे हे आव्हानात्मक असते. पण नागरिकांचा पाठिंबा मिळाला की काम सोपे होते. स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग हा आमच्यासाठी सर्वात मोठा प्रेरणास्रोत आहे
— स्नेहा चांदणे, आरोग्य निरीक्षक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नव्याने ओळख निर्माण होत असून, नागरिकांनी थोडी जबाबदारी घेतली, तर आपण मिळून पिंपरी चिंचवड शहर देशातील सर्वात स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर शहर बनवू शकतो.
— संतोषी कदम , आरोग्य निरीक्षक, पिंपरी चिंचवड महापालिका













