महापालिकेच्या ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ उपक्रमाला मागील वर्षाच्या तुलनेत प्रतिसाद वाढला
आतापर्यंत २ हजार ७०० हून अधिक अभिप्राय प्राप्त, १५ सप्टेंबरपर्यंत सहभागी होण्याची नागरिकांना संधी

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाला यंदा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अंदाजपत्रकासाठी महापालिकेच्या आठ प्रभागांमधून २ हजार ७०० पेक्षा जास्त नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी या उपक्रमात २ हजार २७९ नागरिक सहभागी झाले होते. त्या तुलनेत यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ अंतिम मुदत आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२५ रोजी या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांना ऑनलाईन अभिप्राय देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांनी देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत अभिप्राय नोंदवले. या अभिप्रायांमध्ये रस्त्यांचे नूतनीकरण, फूटपाथ बांधकाम, उद्यान विकास, जलनिस्सारण सुधारणा आणि नागरी सुविधा यांसह विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे.
नागरिकांनी सूचवलेल्या कामासाठी त्यांच्या प्रभागातून वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के रक्कमेची तरतूद केली जाते. त्यानुसार अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये मागील वर्षी प्राप्त झालेल्या नागरिकांच्या सूचनांचा विचार करून आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवून १३६ कोटी ९८ लाख इतक्या निधीची तरतूद ४९९ कामांसाठी करण्यात आली होती. ज्यामध्ये रावेत येथील नवीन शाळा इमारत, पुनावळे येथील प्रमुख रस्त्याचे काम अशा विविध कामांचा समावेश होता.
यंदाही या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अद्यापही या उपक्रमासाठी ज्या नागरिकांना अभिप्राय नोंदवायचा असेल, त्यांनी १५ सप्टेंबर २०२५ पूर्वी तो नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
असा नोंदवा अभिप्राय
नागरिकांना महापालिकेच्या pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरून अभिप्राय नोंदवता येईल.
तसेच नागरिक याhttps://www.surveymonkey.com/r/D8TBZRH लिंकला भेट देऊन ऑनलाईन अभिप्राय नोंदवू शकतात.
पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप डाउनलोड करून तेथेही नागरिकांना अभिप्राय नोंदवता येईल.
‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाला मागील वर्षाच्या तुलनेत जास्त प्रतिसाद मिळाला आहे. यावरून पिंपरी चिंचवड महापालिकेवर असणारा नागरिकांचा विश्वास दिसून येतो. पिंपरी चिंचवडच्या विकासाला आकार देण्यात सक्रिय सहभाग होण्याची नागरिकांची इच्छा दिसून येते. अद्यापपर्यंत जे नागरिक या उपक्रमात सहभागी झाले नाहीत, त्यांनी त्यांचा अभिप्राय १५ सप्टेंबर २०२५ पूर्वी नोंदवून या उपक्रमात सहभागी व्हावे.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका













