“गणेशोत्सव व ईद मिरवणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांचा ‘फुलांनी’ सत्कार”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सव व ईद मिरवणुका या दोन्ही महत्त्वाच्या सणांदरम्यान शहरात लाखो नागरिक रस्त्यावर उतरतात. अशा वेळी कोणतेही विघ्न न येता शांततेत व यशस्वीरीत्या सण पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. विशेषतः महिला पोलिसांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
अलीकडेच पार पडलेल्या अकरा दिवसांच्या गणेशोत्सवात, तसेच ईदच्या मिरवणुकांदरम्यान महिला पोलिसांनी आपले घराचे सण बाजूला ठेवून समाजासाठी कर्तव्य बजावले. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा – पहाटे दोन वाजेपर्यंत महिला पोलिस रस्त्यावर बंदोबस्त करत होत्या.
या त्यांच्या समर्पित सेवेबद्दल “स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान” या संस्थेच्यावतीने महिला पोलिसांचा विशेष सत्कार करण्यात आला. निर्मला जगताप, नीरजा देशपांडे, अनिता धाक्रस व माधव पाटील यांनी पुढाकार घेऊन चौका चौकामध्ये बंदोबस्त करणाऱ्या महिला पोलिसांना फुल देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
ईद मिरवणुकीच्या दिवशी संध्याकाळी पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध चौकांत महिला पोलिसांचा सन्मान करताना, सामाजिक सलोखा आणि कर्तव्यनिष्ठेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
या उपक्रमातून समाजात पोलिसांविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन वाढण्यास मदत होणार आहे, असे मत नागरिकांतून व्यक्त करण्यात आले.




















