ताज्या घडामोडीपिंपरी
उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात पिंपरीत गणरायाला निरोप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…’ या जयघोषात शनिवारी (दि.6 सप्टेंबर) 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शनिवारी संध्याकाळनंतर 10 दिवसांच्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची पावले नदीपात्राकडे वळत होती. त्यामुळे पवना नदीपात्र तसेच घाट परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
मोरया रे… बाप्पा मोरया रे… चा जयघोष रस्त्यारस्त्यांवर ऐकू येत होता.शहराच्या तुलनेत पिंपरीतील अनेक मंडळांनी डीजेचा दणदणाट सालाबादाप्रमाणे कायम ठेवला होता. काही मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा आणि झांजपथकाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अनेकांनी फुलांची मनसोक्त उधळण केली.
डीजेच्या तालावर नाचणाऱ्यांसह मिरवणूक रथांवरील आरास पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पिंपरीतील प्रमुख रस्ते, चौक गजबजलेले होते. पिंपरीतील कराची चौक येथे महापालिका आणि पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांच्या स्वागतासाठी कक्ष उभारण्यात आले होते. दुपारी सव्वा दोन सुमारास विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली. रात्री ११. ४० मिनिटांनी २९ गणेश मंडळे पिंपरी कराची चौकातून मार्गस्थ झाली होती.विसर्जनादरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी अग्निशमन दलातर्फे प्रमुख विसर्जन घाटांवर जवान आणि खासगी जीवरक्षक तैनात करण्यात आले होते.
श्री गणेश मित्रमंडळ पिंपरी, मोरया मित्र मंडळ, श्री साई मित्र मंडळ, शिवतेज मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, ढोल ताशा वादक मित्र मंडळ, फुल मार्केटचा राजा, लाल बहादूर शास्त्री मंडळ, न्यू स्टार मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळांचे ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्ती शक्तीचा संदेश देणारा देखावा सादर करणाऱ्या कलाकारांचा सन्मान कराची चौकातील स्वागत कक्षात करण्यात आला.
या देखाव्यामध्ये विठ्ठल रखुमाई-संत तुकाराम महाराज -छत्रपती शिवराय यांची वेशभूषा साकारत मिरवणुकीत सहभाग घेतला होता. यावेळी शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर लाल बहादूर शास्त्री मंडईने नेहमीप्रमाणे आपली वारकरी परंपरा जपली. हे दृश्य पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती.













