सफाई सेवक हे शहराचे खरे हिरो – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे सफाई सेवक हे शहराचे खरे हिरो आहेत. अशा सफाई कर्मचाऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘अवकारिका’ या चित्रपटात सफाई सेवकांचे रोजचे वास्तव, त्यांच्या कार्यातील अडचणी, समाजातील अपप्रवृत्तींशी त्यांचा संघर्ष आणि स्वच्छतेसाठीचे समर्पण याचे प्रांजळ आणि प्रभावी चित्रण करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.
‘अवकारिका’ या चित्रपटाचा स्वच्छता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी मोफत शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, अंकुश झिटे, चित्रपटाचे दिग्दर्शक अरविंद भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले,’शहर स्वच्छतेची जबाबदारी फक्त महापालिकेची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. स्वच्छता सेवकांच्या मेहनतीला समाजाने योग्य आदर दिला पाहिजे. नागरिकांनीही स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे,’ असेही ते म्हणाले.
‘स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहराने देशात ७ वा आणि महाराष्ट्रात १ वा क्रमांक मिळवून एक मोठे यश मिळवले आहे. हे यश महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांबरोबरच जागरूक नागरिकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले,’ असेही अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी सांगितले.
सामाजिक जाणिवा जागवणारा चित्रपट
यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी अवकारिका चित्रपटाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘समाजात सफाई कर्मचाऱ्यांविषयी जागरूकता आणि आदराची भावना निर्माण व्हावी, यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरेल. हा केवळ एक चित्रपट नसून, प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणारा, अंतर्मुख करणारा अनुभव आहे.’














