ताज्या घडामोडीपिंपरी

कमी उत्सर्जन क्षेत्रांच्या अंमलबजावणीसाठी ब्रिटिश उच्च उपायुक्त आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण कार्यशाळेचा शुभारंभ

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका आणि ब्रिटिश उच्च उपायुक्त, मुंबई तसेच ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने कमी उत्सर्जन क्षेत्रे (लो इमिशन झोन्स – एल.ई.झी) योजनेच्या नियोजन व अंमलबजावणीवर आधारित तांत्रिक कार्यशाळेचा शुभारंभ आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व ब्रिटिश उच्च उपायुक्त जेमी स्कॅटरगुड यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, कार्यकारी अभियंता सुनिल पवार,हरविंदसिंग बन्सल, सोहम निकम, युके पॅक्ट प्रकल्प अधिकारी कनुप्रिया शर्मा, ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या लीह रॅफर्टी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मेट्रोचे वरिष्ठ सहाय्यक महाव्यवस्थापक रत्नाकर पांडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मंचक जाधव, पुणे महानगर परिवहन महामंडळचे बीआरटी व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, ग्लोबल ट्रॅफिक सोल्यूशनचे प्रताप भोसले यांच्यासह कार्यशाळेत महापालिका अधिकारी, ब्रिटिश उच्च उपायुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी, ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे तज्ञ आणि वाहतूक क्षेत्रातील विविध विशेषज्ञ सहभागी झाले आहेत.

२ ते ६ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टी.एफ.एल) चे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत असून, महापालिकेला कमी उत्सर्जन क्षेत्र धोरणाच्या अंमलबजावणीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. कार्यशाळेमध्ये नियोजन, अंमलबजावणी, जनजागृती, तंत्रज्ञान आणि हितधारक संवाद यांसारख्या बाबींवर सखोल चर्चा होणार आहे. लंडनमधील अल्ट्रा लो इमिशन झोनच्या (यु.एल.इ.झी) यशस्वी अनुभवावर आधारित हे सत्र राबवण्यात येत आहे. ही कार्यशाळा महापालिकेच्या लो इमिशन मोबिलिटी झोन्स (एल.इ.एम.झेड) धोरणास अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

ट्रान्सपोर्ट फॉर लंडन सोबत केलेली ही भागीदारी महापालिकेस आंतरराष्ट्रीय अनुभवांमधून शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. विशेषतः वायुप्रदूषण मोजणी, जनजागृती मोहिमा, तांत्रिक अंमलबजावणी आणि नागरी सहभाग यासाठी ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून नागरीकांमध्ये जनजागृती वाढवणे, माहिती निरीक्षण प्रणाली सक्षम करणे आणि अंमलबजावणीसाठी संस्थात्मक क्षमता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे.

हा उपक्रम यूके-इंडिया पार्टनरिंग फॉर एक्सलरेटेड क्लायमेट ट्रान्झिशन निधीच्या माध्यमातून राबवण्यात येत असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ हवा मोहिमेशी पूर्णतः सुसंगत आहे. महापालिकेच्या ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लॅनमध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या लो इमिशन मोबिलिटी झोन धोरणानुसार, २०२६ पर्यंत निवडक भागांमध्ये केवळ BS-6 आणि इलेक्ट्रिक वाहनेच वापरण्यास परवानगी देण्याबाबत नियोजन आखण्यात आले आहे.

पुढील चार दिवस कार्यशाळेमध्ये कमी उत्सर्जन क्षेत्र धोरणाची एकत्रित शहरी विकासाशी सांगड घालणे, नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्टचा समावेश करणे, इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्दिष्टांची पूर्तता आणि सार्वजनिक वाहतूक सुविधांशी सुसंगत प्रथम व शेवटच्या टप्प्यांपर्यंत प्रभावी संलग्नन करणे यावर सखोल चर्चा होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक उपाययोजनांसाठी एक व्यापक प्रणाली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येत आहे. यासाठी ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे तांत्रिक सहकार्य नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या संस्थेच्या तज्ज्ञांकडून करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनामुळे शहरातील कमी प्रदूषण क्षेत्रे प्रभावीपणे निश्चित करून त्यादृष्टिने नियोजन करणे शक्य होईल, व हे नियोजन पिंपरी चिंचवड शहरामध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवता येईल.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

स्वच्छ आणि आरोग्यदायी शहरे निर्माण करण्यासाठी ब्रिटन सरकार आणि भारत सरकार दोघांची समान प्राथमिकता आहे. युके पॅक्ट आणि ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने ही कार्यशाळा आयोजित करून शहराच्या स्वच्छ वाहतूक आणि शाश्वत नागरी विकासाच्या उद्दिष्टाला पाठिंबा देण्याच्या दृष्टिने पुढाकार घेतला आहे. ही आमच्यासाठी देखील अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण स्थानिक पातळीवरील भागीदारी कशा प्रकारे जागतिक हवामान कृतीस चालना देऊ शकते, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
– जेमी स्कॅटरगुड, ब्रिटिश उच्च उपायुक्त, मुंबई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi