महापौरपदी रवि लांडगे निश्चित, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचा अर्ज
महापौरपदी रवि लांडगे निश्चित, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचा अर्ज
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपली उमेदवारी अधिकृतपणे दाखल केल्याने शहराच्या राजकारणात भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महापौरपदासाठी बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांचा अर्ज दाखल करण्यात आला असून, उपमहापौरपदासाठी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपकडे महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्याने रवि लांडगे यांची महापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी गावकी-भावकीतील मतभेद दूर करून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेले मतभेद बाजूला ठेवून महापालिका निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासाचा संकल्प पूर्ण केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अर्ज दाखल करताना सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. महापौरपदी रवि लांडगे आणि सत्तारुढ पक्षनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड निश्चित झाल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, शहराचे दिवंगत नेते कै. अंकुशराव लांडगे यांच्या विचारांना पुढे नेत त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला शहराच्या प्रथम नागरिकपदाचा मान मिळत असल्याने ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आमदार महेश लांडगे यांनी नमूद केले. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे भाजपकडून कोणताही आनंदोत्सव साजरा न करता श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महापालिकेतील नेतृत्व बदलासह भाजपने एकजुटीचा संदेश देत पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.




















