ताज्या घडामोडीपिंपरी

आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण

स्मार्ट युगात स्मार्ट शहरासाठी आधुनिक संकेतस्थळाची लोकाभिमुख सुरुवात

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना डिजिटल माध्यमातून अधिक पारदर्शक, सक्षम व गतिमान सेवा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, नव्याने विकसित करण्यात आलेल्या महापालिकेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. हे संकेतस्थळ आता सर्व नागरिकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले आहे.

चौकट – नवीन संकेतस्थळाची प्रमुख वैशिष्ट्ये –
• ॲक्सेसिबिलिटी स्टँडर्ड:
दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ असलेले संकेतस्थळ, डब्ल्यूसीएजी च्या डबल-ए (AA) मानांकनासह सुसज्ज आहे.
• कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सर्च:
चॅट जीपीटीचा वापर करून माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असून नागरिकांचे प्रश्न अधिक वेगात आणि अचूकतेने हाताळण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.
• प्रणालीमध्ये सुरक्षितता आणि अभिप्राय नोंद प्रक्रियेत सुधारणा:
हॅकथॉन २०२५ अंतर्गत मिळालेल्या देशभरातील १७५ तज्ज्ञ सहभागींच्या अभिप्रायानुसार संकेतस्थळात सुधारणा करण्यात आल्या असून एथिकल हॅकर्समार्फत सखोल सुरक्षा तपासणी करण्यात आली आहे.
• शासन नियमांचे पालन:
केंद्र शासनाच्या GIGW मार्गदर्शक तत्त्वांनुसार संकेतस्थळाचे डिझाईन करण्यात आले आहे.
• संपूर्ण डिजिटल सेवा एकाच ठिकाणी:
करसंकलन, देयके भरणे, तक्रारी नोंदवणे यांसारख्या सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.

या प्रकल्पासाठी महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आणि श्रीमती उज्वला गोडसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कोट
“महापालिकेचे नवे संकेतस्थळ हे नागरिक केंद्रित दृष्टिकोनातून तयार करण्यात आले असून, त्याचा उद्देश शहरवासीयांना डिजिटल माध्यमातून जलद, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देणे हा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ॲक्सेसिबिलिटी स्टँडर्ड्स आणि सुरक्षेच्या आधुनिक निकषांचा समावेश करून हे संकेतस्थळ अधिक सुलभ आणि विश्वासार्ह बनविण्यात आले आहे. हॅकेथॉन २०२५मधून मिळालेल्या तज्ज्ञांच्या अभिप्रायावर आधारित सुधारणा आणि एथिकल हॅकर्समार्फत सुरक्षा चाचणी यामुळे संकेतस्थळाची गुणवत्ता अधिक बळकट झाली आहे.
-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या संकेतस्थळाचा विकास करताना केवळ तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रीत न करता, नागरिकांचा अनुभव केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. हे संकेतस्थळ केवळ माहिती पुरवणारे माध्यम नसून, महापालिकेच्या विविध सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणारा प्रभावी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून माहिती शोधण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि संवादात्मक केली आहे. दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ ॲक्सेसिबिलिटी फीचर्स आणि सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करत संकेतस्थळ अधिक समावेशक आणि सुरक्षित बनविण्यात आले आहे.
-निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान विभाग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button