पवना धरणातून विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील अनेक खेडी आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांची पाण्याची चिंता अखेर दूर झाली आहे. मावळ परिसराला आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख पवना धरण आज (दि. १९ ऑगस्ट) ९९.७० टक्के भरून जवळपास शंभर टक्के क्षमतेवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी धरणातून सुरू झालेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाण वाढलेआहे. त्यामुळे दुपारी साडेतीनच्या सुमारास धरणाचे सहाही दरवाजे उघडून ५७६० क्युसेक तर विद्युतगृहातून १४०० क्युसेक असा एकूण ७१६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे कोथुर्णे पुलावरून पाणी गेले असून मळवंडी ठुले, वारु आणि कोथुर्णे गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
सकाळपासून धरण क्षेत्रात तब्बल ३१ मि.मी. पाऊस झाला. विशेषतः धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणात पाण्याचा सतत ओघ सुरूच आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन विसर्गाचे प्रमाण कमी-जास्त केले जाऊ शकते, असे धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी सांगितले. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले असून नदीकाठच्या गावकऱ्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे व सुरक्षित अंतर राखावे, असेही आवर्जून सांगितले.















