दुबईत पर्युषण महापर्वाचे भव्य आयोजन: जप, तप, साधना आणि क्षमापर्वाने भक्तीमय वातावरण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जैन समाजाचा सर्वात मोठा धार्मिक सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्युषण महापर्वाचे आयोजन दुबईत भक्तिभावाने पार पडले. पुण्यातील ज्येष्ठ समाजसेवक आणि स्वाध्यायी डॉ. अशोककुमार पगारिया यांनी या धर्मसभेमध्ये पर्युषण पर्वाचे महत्त्व सांगत विचार मांडले. “पर्युषण हे जप, तप, साधना, संतवाणी आणि स्वाध्याय या पंचसूत्रीवर आधारित आत्मशुद्धीचे पर्व आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
या अष्टदिवसीय पर्वात साधू-साध्वींच्या जिनवाणीमधून श्रावकांना धर्म, त्याग, अपरिग्रह, विरक्ती आणि आत्मा-परमात्म्याच्या एकात्मतेचे मार्गदर्शन मिळते. रोज प्रवचन, प्रार्थना, प्रतिक्रमण, व्रत आणि तपश्चर्या यामुळे जैन समाज भक्तिभावाने एकवटतो. या काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते.
यावर्षी प्रथमच अखिल भारतीय स्वाध्याय संघाच्या वतीने तीन मान्यवर स्वाध्यायी — डॉ. अशोककुमार पगारिया, शांतीलालजी फुलफगर आणि ॲड. पी. एम. जैन — यांना दुबई येथे जिनवाणी प्रभावना करण्यासाठी पाठविण्यात आले. दुबई जैन संघाचे अध्यक्ष श्री. धीरज जैन व महिला अध्यक्षा सौ. ममताजी जैन यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले.
सिंधी सेरेमोनियल हॉल, मीना बाजार येथे झालेल्या कार्यक्रमात शेकडो श्रावक-श्राविका, युवक-युवतींनी उपस्थित राहून प्रवचन, सूत्रवाचन आणि प्रतिक्रमणात भाग घेतला. सूत्रवाचनाची जबाबदारी ॲड. पी. एम. जैन संचेती यांनी पार पाडली, तर प्रतिक्रमणाचे नेतृत्व शांतीलालजी फुलफगर यांनी केले.
पर्वाच्या अखेरच्या दिवशी ‘क्षमावाणी’ दिन साजरा करण्यात आला. यामध्ये प्रत्येकाने परस्परांशी क्षमायाचना करून आपापल्या चुकांची माफी मागितली. “मिच्छामी दुक्कडम्” या पवित्र शब्दांद्वारे हे पर्व समाप्त झाले.













