पिंपळे सौदागरच्या पीके चौकात भीषण अपघात
वाहन चालकांच्या अडवणुकीतच धन्यता मानणाऱ्या वाहतूक पोलीसांच पिके चौकाकडे दुर्लक्ष सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांचा आरोप

सांगवी वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा बळी
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपळे सौदागर येथील पीके चौकात आज दुपारी सव्वा बारा वाजता आरएमसी डंपरने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. त्यात चिंचवड येथील 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
हा अपघात केवळ डंपर चालकाच्या बेदरकारपणामुळे नाही, तर सांगवी वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे, असा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी केला आहे.
ते म्हणाले, ”पिंपळे सौदागर येथील पीके चौकात एकही वाहतूक पोलीस कर्तव्यावर नसतो. त्यातच येथील सिग्नलचा टाईमींग देखील मोठा आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये सिग्नल तोडण्याची सवयच लागली आहे. अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज असताना हा चौक पूर्णतः रामभरोसे सोडला आहे. यातून अशा गंभीर दुर्घटना घडत आहेत. पण तरीही वाहतूक विभागाचे डोळे उघडत नाहीत.
मुळात या चौकात वाहतुक पोलीसाची खरी गरज असताना शेजारच्या शिवार चौकात पाच ते सहा वाहतुक पोलीस कर्मचारी या ना त्या कारणाने वाहनचालकांच्या अडवणुकीत व्यस्त असतात. ते कशासाठी हे वेगळ सांगण्याची गरज नाही. सांगवी वाहतुक पोलीस विभागाचे बेजाबदार पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांचा कामचुकारपणा याला कारणीभूत ठरला आहे. या चौकात वाहतुक पोलीस नेमणुकीस असता तर, ही दुर्घटना घडली नसती. आतातरी या घटनेची दखल घेऊन पिके चौकात ताबडतोब वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी संदीप काटे यांनी केली आहे.
दरम्यान सांगवी वाहतुक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांच्याशी अधिकृत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.














