ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर उद्या पिंपरीत कार्यकर्ता बैठक; प्रा. हाके, ॲड. ससाणे, मृणाल ढोले पाटील उपस्थित राहणार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओबीसी आरक्षणबचाव कृती समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हॉलमध्ये (महात्मा ज्योतिराव फुले स्मारकाच्या मागील बाजूस), पिंपरी येथे होणार आहे.
या बैठकीचा विषय “ओबीसी आरक्षणाची दशा व दिशा” असा असून, ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि पुढील आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी नामांकित ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, ॲड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील आणि राजाराम पाटील उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या टिकावासाठी सध्या राज्यभरात सुरू असलेल्या चळवळीला गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी भविष्यातील भूमिका व कृती आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.




















