ताज्या घडामोडीपिंपरी
वारंवार वीज खंडित होण्याच्या त्रासामुळे नागरिक हैराण; महावितरणकडे शिवसेनेचा तीव्र संताप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेक नगर, तुळजा वस्ती, एकता नगर, रुपेश कॉलनी, टेल्को, कपूर कॉलनी, उंबरवाडी, श्रीकृष्ण क्रांती नगर, बौद्ध वस्ती, सुभाष पांढरकर नगर, भंगारवाडी, खडीमशीन परिसर, काळभोरनगर, रामनगर, मोहननगर, फुलेनगर, गवळीवाडा, चिंचवड स्टेशन, दावा बाजार, साईबाबा नगर या परिसरात रोज वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.या वाढत्या समस्येवर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी युवासेना उपशहर प्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता, भोसरी पुणे यांना एक निवेदन सादर केले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारंवार वीज खंडित होण्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून परीक्षेच्या काळात हा त्रास अधिक गंभीर बनतो आहे. तसेच अनेक नागरिक “वर्क फ्रॉम होम” करत असून, वीज नसल्यामुळे त्यांचेही काम ठप्प होते आहे.
दररोज ४ ते ५ तास वीज खंडित होत असून, महावितरणच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला जात नाही, अशी तक्रारही त्यांनी केली आहे. नागरिक वेळेवर वीज बिल भरत असतानाही त्यांना नियमित वीजपुरवठा मिळत नाही, ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शिवसेनेने केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.













