न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची आकर्षक वेशभूषा धारण करून ‘गोविंदा आला रे आला’ या गाण्यावर नृत्य सादर केले. श्रीकृष्णाच्या बाललीलेबद्दल माहिती देण्यात आली तसेच पाळणा आणि आरतीचे गायन करून वातावरण भक्तिमय करण्यात आले. इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या मुला-मुलींनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्याने गोविंद पथकाने पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून उत्सवाला जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण केले. या प्रसंगी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गीतांजली दुबे आणि चेतना देशमुख यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर सारिका देशमुख यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांचा उत्साह, पारंपरिक पोशाख आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण शाळा उत्सवाच्या रंगात रंगली होती.















