न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त ग्रंथदिंडी व निर्मलवारी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त ग्रंथदिंडी व निर्मलवारी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून दिंडीमध्ये ग्यानबा-तुकारामचा जयघोष व हरिनामाचा जयजयकार करीत दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हरिनामाच्या गजराने सर्वच परिसर भक्तिमय झाला होता. संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथपूजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, तसेच पालक विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अनेक विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठूनामाचा जयजयकार करीत, तर विद्यार्थी गळ्यात टाळ अडकवून ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली म्हणत दिंडीत सहभागी झाले होते. तसेच पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देत “झाडे लावा झाडे जगवा” अशा घोषणा देत होते ‘तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठल रुक्माई’ असे अनेक वेगवेगळी वेशभूषा केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थिताचे लक्ष वेधून घेत होते.












