राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पिंपरी-चिंचवड शहर वतीने आमदार गोपीचंद पडळकर विरोधात निषेध आंदोलन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद पेटला असून, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पडळकर यांनी तात्काळ माफी न मागितल्यास त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे.
सहकार महर्षी स्व. राजाराम पाटील सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी व कामगार वर्गाला आर्थिक बळकटी दिली. शिक्षण, सहकार व सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात त्यांनी आयुष्य वाहून घेतले. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून जयंत पाटील साहेब हे सत्यनिष्ठा, अभ्यासू वृत्ती व प्रामाणिक नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार परंपरेचे खरे वारसदार ठरले आहेत.महाराष्ट्राचे आदरणीय नेते, थोर समाजकारणी, ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री मा. जयंत पाटील साहेब यांच्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले अशोभनीय, खालच्या स्तरावरचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळिमा फासणारे वक्तव्य ही अतिशय निंदनीय व निषेधार्ह बाब आहे.
हे वक्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(2) नुसार सार्वजनिक शिस्त व नैतिकतेच्या मर्यादांना धक्का देणारे असून, भारतीय दंड संहिता कलम 499 व 500 नुसार मानहानीस पात्र आहे. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे गैरजबाबदार वक्तव्य करणे ही लोकशाही मूल्यांचा अवमान करणारी कृती आहे.
यासंदर्भात पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मा. तुषार कामठे (माजी नगरसेवक )यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील नेत्या माजी नगरसेविका डॉ . सुलक्षणा शिलवंत -धर ,शहर वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड.धम्मराज साळवे ,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे ,विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष राहुल अहिरे ,सचिव योगेश सोनवणे ,सचिव परमेश्वर गायकवाड , संदेश जगताप यांनी निषेध भूमिका मांडली यावेळी माजी नगरसेवक गणेश भोंडवे ,के के कांबळे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष सोनल पासलकर ,नागेश सदावर्ते ,बबलू चंदने , ॲड.विजय बाबर,शाम घोडके व इतर कार्यकर्ते, मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी एकमुखाने आमदार पडळकर यांचा निषेध नोंदवत, महाराष्ट्राच्या राजकारणात आदरयुक्त परंपरा जपण्याची मागणी केली.
शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी या वेळी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की –
“जयंत पाटील साहेब हे स्वच्छ प्रतिमेचे, अभ्यासू, तळागाळातील प्रश्न मांडणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय नेते आहेत. त्यांच्या बाबतीत कुठल्याही व्यक्तीने अशोभनीय भाषा वापरणे म्हणजे संपूर्ण समाजाचा व जनतेचा अपमान आहे. या प्रकाराची आम्ही तीव्र शब्दात निंदा करतो. अशा पातळीवरील वक्तव्य करणाऱ्यांना राजकारणात जागा नसल्याचे लक्षात आणून देतो. मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी तात्काळ अशा वाचाळवीरांना आवर घालावा तसेच अशा घटनांबाबत भविष्यात कायदेशीर पातळीवर कारवाई करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.”
या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच पुढे जर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्या, तर पक्षाकडून राज्यभरात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणात सभ्यता, आदरयुक्त परंपरा व शिष्टाचार कायम राखले गेले पाहिजेत, अशी जनतेची स्पष्ट अपेक्षा आहे.













