ताज्या घडामोडीपिंपरी

“मतदारयादीतील गोंधळ तातडीने दूर करा; राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य निवडणूक आयोगाकडे ठाम मागणी”

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला असून, “निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी तातडीने सुधारणा कराव्यात,” अशी ठाम मागणी पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात, १६ जुलै २०२५ रोजी आयोगाने दिलेल्या आदेशातील स्पष्ट सूचनांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता अनेक भागांची संपूर्ण मतदार यादी चुकीच्या प्रभागात टाकण्यात आल्याने हजारोंच्या संख्येने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

मुख्य आक्षेप :

1. प्रभाग सीमेवरील मतदारांची नावे तपासण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आवश्यक असूनही, कोणतीही पडताळणी न करता अनेक वस्त्या पूर्णपणे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्या. काही प्रभागांमध्ये तर ५ हजारांपेक्षा जास्त मतदारांचा गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

2. ‘सेक्शन अॅड्रेस’ चुकीचा असूनही इमारत/वस्तीच्या प्रत्यक्ष स्थानावर आधारित योग्य प्रभागात नाव न टाकता मोठ्या प्रमाणात चुकीचे समावेशन करण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला.

3. मतदारांना आपले नाव नेमक्या कोणत्या प्रभागात आले आहे हे तपासण्यासाठी ऑनलाइन/ॲपवरील शोध सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे.
PDF याद्यांमध्ये शोध सुविधा व फोटो नसल्याने एकाच नावाच्या मतदारांचे ओळखण्यात अडथळे येत असल्याचेही सांगण्यात आले.

4. चुकीच्या विभाजनामुळे अनेक वस्त्यांना सामूहिक हरकती दाखल करण्याची वेळ आली असूनही, प्रशासन Suo Moto कार्यवाही टाळत आहे, असा आरोप निवेदनात आहे.

5. प्रारूप मतदारयाद्यांमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक दुबार/तिबार नावे आढळली, मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी :

मतदारांना नाव शोधण्यासाठी युजर-फ्रेंडली ऑनलाइन/ॲप सर्च सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्यावी.

PDF याद्यांमध्ये थेट ‘सर्च’ सुविधा देण्यात यावी.

जिथे पूर्ण वस्त्या चुकीच्या प्रभागात टाकल्या आहेत, तिथे स्थळ पाहणी करून Suo-Moto दुरुस्ती सुरू करावी.

प्रभागस्तरावर विशेष सहायता केंद्रे (Help Centers) तातडीने सुरू करावीत.

हरकती नोंदविण्याची नियत मुदत वाढवावी व ऑनलाइन हरकतीची सुविधा सुरू करावी.

दुबार मतदारांच्या तपासणीसाठी स्वतंत्र सेल स्थापन करून त्याची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करावी.

राजकीय पक्षांनी दाखवलेल्या त्रुटींवर महानगरपालिका आयुक्तांना स्वतंत्र चौकशी व दुरुस्तीची मुभा द्यावी.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी आणि मतदारांचा मनस्ताप कमी करण्यासाठी या सर्व मागण्यांवर राज्य निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी पुणे आणि पिंपरी–चिंचवड आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button