ताज्या घडामोडीपिंपरी
नवरात्र उत्सवासाठी मनपा शाळेच्या मैदानाला परवानगी नाकारली; विठ्ठल प्रतिष्ठानची नाराजी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक 14 मधील शितळादेवी मंदिराच्या मागे असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वसंतदादा पाटील मराठी व फकीरभाई पानसरे उर्दू शाळा मैदानावर नवरात्र उत्सव साजरा करण्यास यंदा परवानगी नाकारण्यात आल्याने विठ्ठल प्रतिष्ठानने नाराजी व्यक्त केली आहे.
या संदर्भात प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल उमाकांत दळवी यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. “दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम नियोजित असून, सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र यंदा अचानक अ. क्षेत्रीय कार्यालय, निगडी येथून परवानगी नाकारण्यात आली आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे.
दळवी यांनी सांगितले की, कार्यक्रम सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत घेतला जातो. मंडप मैदानाच्या एका बाजूला उभारला जातो आणि मैदान दिवसभर मोकळेच राहते. शाळेच्या शिक्षण कार्यात कोणताही अडथळा निर्माण होत नाही.
महत्त्वाचे म्हणजे, गेल्याच महिन्यात याच मैदानावर गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात आली होती, हे नमूद करत प्रतिष्ठानने प्रश्न उपस्थित केला की, त्याच ठिकाणी नवरात्र उत्सवासाठी परवानगी का नाकारण्यात येत आहे?
विठ्ठल प्रतिष्ठान ही धर्मादाय नोंदणीकृत संस्था असून, सदर मैदानावर कोणताही व्यवसायिक उपक्रम न करता केवळ धार्मिक व सांस्कृतिक उत्सव साजरे केले जातात, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
“आमच्याकडे पर्यायी जागा नाही. सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. अचानक कार्यक्रम रद्द करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या वर्षी तरी सन्मानपूर्वक परवानगी द्यावी,” अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानने महापालिकेकडे केली आहे.













