ताज्या घडामोडीपिंपरी
नवी सांगवीत‘सूरमयी दिवाळी पहाट’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित ‘सूरमयी दिवाळी पहाट’ या कार्यक्रमात ‘श्री तिथं सौ’ या अनोख्या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी पहाटेच्या गारव्यात रसिकांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाईला भुलविणारे किस्से, कविता आणि सुरेल गाण्यांनी वातावरण भारावून गेले.
यावेळी भाऊसाहेब भोईर, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर, दत्त मंदिराचे शिवानंद स्वामी महाराज, वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, उद्योजक अरुण पवार, ऍड. अभिषेक जगताप, श्रीधर फौजदार, शशिकांत गायकवाड, बाळासाहेब पिल्लेवार, शिवाजी पाडुळे, सुनील गायकवाड, नायब तहसीलदार श्रावण ताते, आप्पा कुंजीर, नंदकुमार कटारे, प्रदीप जगताप, सचिन शेलार, प्रदीप गायकवाड, कमलाकर जाधव, उद्योजक वामनराव कड, राजेंद्र कर्नावट, डॉ. प्रदीप ननवरे, शैलेश शहा, पंकज मालवीय, संदीप राठोड, विजय खंदारे, प्राचार्य डॉ. आनंद दडस, प्राचार्य डॉ. सुरेश धरणे नारायण सूर्यवंशी, निखिल जगदाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात गायिका मधुरा परांजपे यांनी ‘मन मंदिरा तेजाने’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘तूच चंद्रमा नभात’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘बगळ्यांची माळ फुले’ अशी एकापाठोपाठ एक गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गायक स्वप्नील गोडबोले यांनी ‘मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते’ या गीतावर टाळ्यांचा कडकडाट मिळवला, तर ‘माय भवानी’ या अंगावर शहारे आणणाऱ्या गीताने वातावरणात स्फूर्ती जागवली. ‘मला वेड लागले प्रेमाचे’ आणि ‘राणी माझ्या मळ्यामंधी’ या गीतांनाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
गायिका चेतना भट यांनी ‘कसे सरतील सये’ आणि ‘नाही कधी कळले जीव वेडावला’ या गीतांनी सुरेलतेचा ठसा उमटवला. मंदार चोळकर यांनी ‘कवितेशी खेळता आलं पाहिजे’ या कवितेसह विविध कवितांमधून रसिकांना कवितांच्या जगतात नेले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेले मधुरा परांजपे आणि स्वप्नील गोडबोले यांचे द्वंद्वगीत ‘आली उमलत माझ्या दारी’ रसिकांच्या मनात घर करून गेले. तर मधुरा परांजपे आणि चेतना भट यांनी सादर केलेल्या मालिकांच्या टायटल गीतांनी रसिकांना जुन्या आठवणींत रमवले. रॅपिड फायर प्रश्नोत्तरांमधील मजेशीर संवादांनी कार्यक्रमात रंगत आणली.
संगीत संयोजन अमिर हडकर, निवेदन परेश दाभोळकर, तर कार्यक्रमाचे संयोजन विजय उलपे यांनी केले.













