नारायण सुर्वे मानवतावादी कवी! – डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कविवर्य नारायण सुर्वे हे मानवतावादी कवी होते!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नारायण सुर्वे यांचे निवासस्थान, स्वानंद सोसायटी, नेरळ येथे व्यक्त केले.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सोहळ्यातील काव्यजागर आणि पुरस्कार प्रदान समारंभात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. श्रमश्री बाजीराव सातपुते अध्यक्षस्थानी होते; तसेच पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, सचिव पुरुषोत्तम सदाफुले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान, महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे कार्यवाह अंजली कुलकर्णी यांना पद्मश्री नारायण सुर्वे काव्यसाधना पुरस्कार, कर्तव्यदक्ष गृहिणी सुनंदा दिगंबर ढोकले यांना मास्तरांची सावली सन्मान आणि कवी दत्तात्रय खंडाळे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर सागर जाधव (‘माती मागतेय पेनकिलर’) , राजेंद्र वाघ (‘श्रमिकांचं गोंदण’), वंदना इन्नाणी (‘मन आभाळ आभाळ’) या कवींच्या कवितासंग्रहांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी नारायण सुर्वे यांचे वारसदार कवी म्हणून निवड करण्यात आलेल्या संगीता झिंजुरके, मानसी चिटणीस, जयश्री श्रीखंडे, प्रभाकर वाघोले, कुमार खोंद्रे या कवींसह पुरस्कारप्राप्त कवींनी नारायण सुर्वे यांच्या वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण करीत काव्यजागर केला.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘केशवसुत ते नामदेव ढसाळ व्हाया नारायण सुर्वे हा आधुनिक मराठी कवितेचा प्रवास आहे. मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या विचारांचा सार असलेल्या सुर्वे यांच्या कवितेचा पट रस्ता ते विद्यापीठ इतका व्यापक आहे. त्यांची कविता सत्याचा अन् श्रमिकांच्या घामाचा जागर करणारी असून विश्वसंस्कृती हा तिचा गाभा आहे. सुर्वे यांचा वैचारिक वारसा लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लेखनातून प्रतीत होतो. अभिजन आणि बहुजन एकत्र येऊन एका कवीच्या जन्मशताब्दीनिमित्त त्याच्या कवितांचा काव्यजागर करतात, ही साहित्यातील अपूर्वाईची बाब आहे!’ सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकातून, नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी, ‘आधुनिक मराठी कवितेच्या पाच निर्णायक टप्प्यांपैकी एका टप्प्यावर नारायण सुर्वे यांची नाममुद्रा कोरलेली आहे असून त्यांची कविता माणूसकेंद्रित आहे!’ असे मत व्यक्त केले. अंजली कुलकर्णी यांनी मनोगतातून, ‘उपेक्षित समाजाच्या व्यथा आणि वेदना सुर्वे यांनी कवितेतून मांडल्या!’ अशी पुष्टी जोडली. सुनंदा ढोकले यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.
कल्पना घारे, गणेश घारे, रजनी कानडे, प्रा. डॉ. नेहा सावंत, दिगंबर ढोकले, इंद्रजित पाटोळे, महेंद्र भारती, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. संगीता झिंजुरके आणि मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.













