डिजिटल मीटरमुळे वाढीव वीजबिलांची नागरिकांची तक्रार; माजी विरोधी पक्षनेते नाना काटेंकडून महावितरणकडे निवेदन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये व बैठ्या घरांमध्ये महावितरणच्या वतीने नव्याने डिजिटल वीज मीटर बसवण्यात आले आहेत. या उपक्रमाचे स्वागत करत असतानाच, नागरिकांच्या तक्रारींचा स्वर वाढू लागला आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या डिजिटल मीटरमुळे वीजबिलात अनावश्यक वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.याबाबत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “नवीन मीटर बंद असतानाही कोणतेही वाचन न घेता अंदाजे रीडिंगवर अवाजवी बिल आकारले जात आहे. नागरिकांनी महावितरण कार्यालयात तक्रार केली तरी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यांचे बिल योग्य असल्याचे सांगून सक्तीने वसुली केली जाते. यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.”
या प्रकारामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. मीटरची विश्वासार्हता, वाचनाची पारदर्शकता आणि ग्राहक सेवा याबाबत महावितरणने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.
माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या निवेदनात महावितरणला काय आवाहन:
वाढीव बिले तपासावीत
मीटर रीडिंगची पारदर्शक तपासणी व्हावी
नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात
अनावश्यक आर्थिक भार नागरिकांवर लादू नये
त्वरित कार्यवाही करून त्रासमुक्ती करावी















