ताज्या घडामोडीपिंपरी

“पिंपळे सौदागरमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद; विरंगुळा केंद्र व भव्य प्रेक्षागृह उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ रहाटणी–पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिकांशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. ना. अजितदादा पवार यांनी थेट संवाद साधला. या संवादात त्यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडत, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र आणि नागरिकांसाठी भव्य बहुउद्देशीय प्रेक्षागृह उभारण्याची ठोस घोषणा केली.

पिंपळे सौदागर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, “ही निवडणूक राष्ट्रीय राजकारणाची नसून स्थानिक प्रश्न सोडवणाऱ्या सक्षम नेतृत्वाची आहे.” या प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, उमेश काटे, शितल काटे आणि मीनाक्षी काटे यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
नाना काटे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत अजित पवार यांनी सांगितले की, पिंपळे सौदागरला ‘डेव्हलपमेंट झोन’ म्हणून ओळख मिळवून देण्यात नाना काटे यांचे मोलाचे योगदान आहे.

“विकासकामांसोबतच २४ तास जनतेसाठी उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणजे खरे लोकनेतृत्व,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. कोविड काळातही सातत्याने नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नाना काटेंना त्यांनी “खरे लोकनायक” असे संबोधले.

यावेळी त्यांनी प्रभागातील प्रमुख विकासकामांचा आढावा घेतला. नाशिक फाटा–जगताप डेअरी मार्गावरील पिके चौक, कोकणे चौक आणि शिवार चौक येथे उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांना गती देण्याचे आश्वासन दिले. कुंजीर चौक–रक्षक चौक रस्ता खुला करण्यासाठी निवडणुकीनंतर ठोस निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विरंगुळा केंद्र, बस डेपोच्या ३.५ एकर जागेवर सांस्कृतिक भवन, पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे मुबलक पाणीपुरवठा, हरित उपक्रमांतर्गत लिनियर अर्बन गार्डन, ‘सेव्हन वंडर्स’ गार्डन, योगा पार्क व जगातील उंच क्लाइंबिंग वॉल अशा अनेक विकासकामांची माहिती त्यांनी दिली.

शहर स्वच्छ, स्मार्ट, प्रदूषणमुक्त व वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी नागरिकांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button