Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, पिंपळे निलख आणि वाकड परिसरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, उंच इमारतींचा सुळसुळाट आणि वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन सेवेचा विलंब होऊन नागरिकांचे जीवित सुरक्षा धोक्यात येत आहे. तरी तातडीने मनपा फायर स्टेशन उभारा अशी मागणी  माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे  केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दापोडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे निलख, वाकड आणि संलग्न परिसरातील वेगाने वाढणारी लोकसंख्या, उंच इमारतींचे साम्राज्य, व्यावसायिक केंद्रांची घनता आणि वाहतूक कोंडी यामुळे हा पट्टा आता उच्च-जोखमीचा झोन बनला आहे. अशा परिस्थितीत येथे मनपा अग्निशमन केंद्राची तातडीने स्थापना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

या संपूर्ण पट्ट्यात आजतागायत एकही मनपा फायर स्टेशन उपलब्ध नसल्याने, आपत्कालीन घटनांमध्ये अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अवाजवी विलंब होत आहे. BRT मार्ग, मेट्रो मार्ग, रेल्वे लाईन आणि कायमस्वरूपी वाहतूक कोंडीमुळे गाड्यांची हालचाल अधिकच मंदावते. परिणामी आग, अपघात, पूर, गवत/जंगल आगी, व्यावसायिक संकुलांतील दुर्घटना अशा परिस्थितींमध्ये नागरिकांचे जीवित आणि मालमत्ता दोन्ही गंभीर धोक्यात येतात.

या परिसरात उभारलेल्या बहुमजली निवासी इमारती, आयटी पार्क्स, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासेस, मल्टिप्लेक्स, CNG–LPG स्टेशन, हॉटेल व्यवसाय अशा उच्च-जोखीमीच्या घटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. यामुळे आपत्कालीन सेवांची उपलब्धता ही वेळेची गरज बनली आहे.

नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “दापोडी–वाकड हा संपूर्ण पट्टा आज शहरातील सर्वाधिक जोखमीच्या विभागांपैकी एक आहे. त्यामुळे येथे आधुनिक अग्निशमन केंद्र, प्रशिक्षित कर्मचारी, अत्याधुनिक वाहने आणि उपकरणे तातडीने उपलब्ध करून द्यावीत.”

या मागणीमुळे नगरपालिकेने आता या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version