नकुल भोईर खूनप्रकरणात महत्त्वाचा तपास टप्पा; पोलिसांचे लक्ष आता प्रियकराच्या मोबाईलकडे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील नकुल भोईर यांच्या खूनप्रकरणात दोन्ही संशयितांच्या पोलिस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. नकुल याच्या पत्नीच्या प्रियकराचा मोबाइल फोन हस्तगत करायचा आहे, असे सांगून पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयात केली होती.
चैताली नकुल भोईर (२८, रा. माणिक काॅलनी, चिंचवड) आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. लिंकरोड, चिंचवड), अशी पोलिस कोठडी वाढवण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. नकुल आनंदा भोईर (४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून त्यांची पत्नी चैताली हिने आपण एकटीने केल्याची माहिती तिनेच पोलिसांना फोन करून दिली. चिंचवड येथील माणिक काॅलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ २४ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास खुनाची ही घटना घडली.
चैताली हिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिला २४ ऑक्टोबर रोजी अटक केली. मात्र या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावे, अशी शंका पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्या दोघांनीही पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणात सिद्धार्थ याचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला २९ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर चैताली आणि सिद्धार्थ पवार यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मोबाइल फोनसाठी कोठडीची मागणी
चैताली आणि सिद्धार्थ या दोघांनाही पुन्हा शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित सिद्धार्थ पवार याचा मोबाइल फोन अद्याप मिळून आलेला नाही. त्यातून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आणि पुरावे मिळण्यास मदत होईल, त्यामुळे मोबाइल फोन हस्तगत करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने चैताली आणि सिद्धार्थ या दोघांच्या पोलिस कोठडीत रविवारपर्यंत (दि. २ नोव्हेंबर) वाढ केली.




















