नकुल भोईर खूनप्रकरणात तपासाला वेग, चैताली भोईर व प्रियकर सिद्धार्थच्या पोलिस कोठडीत आणखी एक दिवस वाढ
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडमधील माणिक कॉलनी परिसरात घडलेल्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खूनप्रकरणात आरोपी पत्नी चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार यांच्या पोलिस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. या दोघांकडून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे मिळविण्यासाठी तपास सुरु असून, सिद्धार्थ पवारचा मोबाइल फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात आला नाही, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.
नकुल आनंदा भोईर (वय ४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा २४ ऑक्टोबरच्या पहाटे त्यांच्या घराजवळील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ गळा आवळून खून करण्यात आला. या घटनेनंतर त्यांच्या पत्नी चैताली भोईर हिने स्वतःच पोलिसांना फोन करून खून केल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी तत्काळ तिला अटक केली.
मात्र चौकशीत चैताली एकटीने हा खून केला नसून तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. लिंकरोड, चिंचवड) याचाही यात सहभाग असल्याची माहिती पुढे आली. तपासादरम्यान सिद्धार्थला पोलिसांनी २९ ऑक्टोबर रोजी अटक केली.
दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी सिद्धार्थचा मोबाइल फोन हस्तगत करण्यासाठी कोठडी वाढविण्याची मागणी केली. पोलिसांच्या युक्तिवादानुसार न्यायालयाने चैताली भोईर आणि सिद्धार्थ पवार यांच्या पोलिस कोठडीत रविवार (दि. २ नोव्हेंबर) पर्यंत वाढ केली आहे.
या प्रकरणातील आणखी पुरावे व डिजिटल माहिती मिळविण्यासाठी पोलिस तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, खुनामागील नेमका हेतू, गुन्ह्याची आखणी आणि दोघांच्या संवादांचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




















