चिंचवडमध्ये धक्कादायक घटना — सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांचा पत्नीच्या हातून खून
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले आणि नेहमीच लोकहितासाठी पुढाकार घेणारे युवा सामाजिक कार्यकर्ते नकुल आनंदा भोईर (वय ४०) यांचा मध्यरात्री पत्नी चैताली भोईर (वय २९) हिच्या हातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे माणिक कॉलनी, चिंचवडगाव परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नकुल आणि चैताली भोईर यांच्यात मध्यरात्री उशिरा घरात कडाक्याचे भांडण झाले. नकुल भोईर हे काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होते, यावरून वारंवार वाद होत होता. या वादाच्या भरात चैतालीने संतापाच्या भरात कपड्याने नकुलचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात प्राथमिक निष्पन्न झाले आहे.
यानंतर चैताली भोईर हिने स्वतः पोलिसांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच तिला ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नकुल भोईर हे चिंचवड परिसरातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी नदी सुधार प्रकल्पाविरोधात जनआंदोलन उभारले होते आणि स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्नांवर भूमिका मांडत लोकांमध्ये लोकप्रियता मिळवली होती.
अलीकडेच ते आणि त्यांची पत्नी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते. दोघांचाही राजकीय प्रचार सुरू झाला होता. दोनच दिवसांपूर्वी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराशेजारी पाडवा निमित्त त्यांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात मोठमोठे पोस्टर आणि होर्डिंगद्वारे चैताली भोईर यांचा प्रचार सुरू होता.
मात्र, या सगळ्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर घरगुती कलह वाढत गेला आणि शेवटी या वादातून या दुर्दैवी घटनेचा शोकांत शेवट झाला.
नकुल भोईर यांच्या निधनाने चिंचवडगाव परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोक आणि अविश्वासाचे वातावरण पसरले आहे.
त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेविषयी खोल दु:ख व्यक्त केले असून, “लोकसेवेसाठी झटणाऱ्या तरुण कार्यकर्त्याचा अशा प्रकारे अंत होणे अतिशय दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
चैताली भोईरला अटक करण्यात आली असून पोलीस या घटनेचा सर्वांगीण तपास करत आहेत. नकुल भोईर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात घरगुती कलह आणि संशयास्पद वादच या खुनाचे मूळ कारण असल्याचे समोर येत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, एका सक्रिय कार्यकर्त्याचे आयुष्य संशय आणि वादाच्या भोवऱ्यात संपुष्टात आले आहे.

















