ताज्या घडामोडीपिंपरी

अधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने व समन्वयाने करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचना

कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्रातील आढावा बैठक संपन्न

Spread the love

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकासकामांचा वेग वाढवावा. विकास कामे करताना समन्वय ठेवावा.  नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

 कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय कामांची आढावा बैठक शुक्रवार ( ६ जून) खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीस प्रांताधिकारी  प्रकाश सकपाळ, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी  समीर खेडेकर, सहाय्यक निबंधक शरयू सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख  संतोष भोईर, जिल्हा संघटक  संभाजी जगताप, विधानसभा समन्वयक भाजप  दिलीप बेहेरे, जिल्हा संपर्कप्रमुख विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख  पंकज पाटील, तालुकाप्रमुख  सुदाम पवाळी, तालुका संघटक  सुनील रसाळ, तालुका संपर्कप्रमुख दिलीप ताम्हाणे, सुरेश टोकरे, माजी नगरसेवक ॲड. संकेत भासे, दिपक बेहरे, प्रसाद थोरवे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीए, एमएमआरडीए, महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, वन, पाणीपुरवठा व स्वच्छता, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, पोलीस, बांधकाम, महसूल अभिलेख, जलसंपदा, सामाजिक न्याय, नगरपरिषद, निबंधक कार्यालय, पर्यटन, महावितरण, अंगणवाडी, रोजगार हमी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, इतर यंत्रणा व स्थानिक प्रशासन अशा एकूण ३२ विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “विकासकामांचा दर्जा, प्रलंबित कामे, अडथळे, उपलब्ध निधी आणि जनतेच्या तक्रारी यावर सखोल चर्चा करण्यात आली. विकासकामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीने व समन्वयाने काम करावे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, वीजखांब आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. कृषी क्षेत्रात झालेल्या नुकसानीबाबत संबंधित खात्यांनी तातडीने कार्यवाही करावी.,”

आमदार महेंद्र थोरवे म्हणाले,  “शासन आणि प्रशासन एकत्र आले तरच विकासाला गती मिळते. ‘टीमवर्क’च्या माध्यमातून काम केले पाहिजे. स्थानिक समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व विभागांनी यासाठी परस्पर समन्वय ठेवावा. अंगणवाड्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. कर्मचार्‍यांच्या अपुऱ्या संख्येबाबत विभागांनी लेखी स्वरूपात मागणी करावी, त्यावर शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

वनमंत्री  गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार लाडिवली येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागी वन उद्यान विकसित करण्यासाठी वन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात पर्यटकांवर निर्बंध न आणता सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह पर्यटन खुले ठेवण्याची भूमिका देखील आमदार थोरवे यांनी मांडली.

बैठकीत विविध खात्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या. भूअभिलेख विभागाने मोजणीसाठी मनुष्यबळ अपुरे असल्याचे निदर्शनास आणले. अंगणवाडी विभागाच्या भारती साताळकर यांनी ‘लेक लाडकी’ योजनेत ४९९ पैकी ४७१ मुलींना पहिला हप्ता वितरित झाल्याची माहिती दिली. मात्र, ४५ अंगणवाड्यांना अद्याप स्वतःची जागा उपलब्ध नाही. शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी अनंत खैरे यांनी तालुक्यातील ३५५ शाळा १६ जूनपासून सुरु होणार असल्याचे सांगितले. तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी रेशनिंगसाठी तीन गोदामांत तीन महिन्यांचे धान्य साठवण्यात येत असल्याचे सांगितले. वन विभागाने पळसदरीतील दरडींमुळे संभाव्य धोका अधोरेखित केला असता, त्यावर पावसाळ्यापूर्वी कारवाईचे आदेश देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi