ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

लोणावळा ते पुणे दुपारची लोकल सुरु करावी, थांबे पुन्हा सुरु करावेत खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

Spread the love

मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करुन डीपीआर लवकर पूर्ण करावा. हा प्रकल्प मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि प्रवाशांना सुलभ करणारा ठरणारा आहे. दोन्ही शहरांमधील वाढती वाहतूक आणि रेल्वेवरचा ताण लक्षात घेता, फास्ट ट्रॅक सेवा ही काळाची गरज आहे. तसेच पुणे-लोणावळा ते पुणे ही दुपारी दीड वाजताची लोकल आणि कोरोना काळात बंद केलेले थांबे पुन्हा सुरु करावेत, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. दीड वाजताची लोकल आणि कोरोना काळात बंद केलेले थांबे पुन्हा सुरु करण्याची ग्वाही वैष्णव यांनी दिली. याबाबतचे सविस्तर निवेदन खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे औद्योगिक, व्यापार, शैक्षणिक हब आहे. प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. मुंबई-पुणे कॉरिडॉरअंतर्गत पनवेल, तळोजा, तळेगाव, चाकण, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी ही औद्योगिक क्षेत्र येत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान देत आहेत. या भागात मालवाहतूक रेल्वे मार्ग बनविण्याची मागणी आहे. मुंबई-पुणे मार्गावर नवीन रेल्वे मार्गाची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करुन डीपीआर लवकर पूर्ण करावा. हा मार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र, मुंबईच्या कनेक्टिव्हीटीला बळ मिळेल.

कोरोना काळात लोणावळा-पुणे लोकलचे नियोजन बदलले होते. दुपारच्या वेळेत लोकल धावत नाही. त्याचा विद्यार्थ्यांना, शिफ्ट ड्युटी करणाऱ्या कामगारांना, विविध कार्यालयीन किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे.

त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांसह कामगारांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दुपारी दीड वाजताची पुणे-लोणावळा लोकल सेवा नियमित सुरू ठेवावी. कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे मावळ लोकसभा मतदारसंघातील स्थानकांवरील थांबे पुन्हा सुरू करण्यात यावेत. या थांब्यांमुळे केवळ प्रवाशांना सुविधा मिळणार नाही, तर या स्थानकांची आर्थिक व प्रशासकीय महत्त्वही वाढणार आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती द्या

पुणे ते लोणावळा या लोकलमधून दररोज एक लाख नागरिक प्रवास करत आहेत. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील रेल्वे गाड्या दोन ट्रॅकवरून धावत आहेत. या मार्गावर तिसर्‍या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 2017 मध्ये मान्यता दिली आहे. याबाबतचा सर्व्हेही झाला आहे. ट्रॅक उभारण्यासाठी रेल्वे विभागाकडे जमीनही उपलब्ध आहे. पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला आवश्यक ती गती मिळत नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यास पुणे आणि मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक अधिक जलद व सुगम होईल. त्यामुळे या कामाला गती देण्याची मागणीही खासदार बारणे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button