ताज्या घडामोडीपिंपरी
कर्मवीरांनी बहुजनांच्या शिक्षणाद्वारे रयतेचा पाया मजबूत केला’ – शशिकांत कराळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी बहुजनांच्या शिक्षणाद्वारे रयतेचा पाया मजबूत केला. पारंपारिक शिक्षणाबरोबरच उद्योजकीय शिक्षणाची असलेली गरज त्यांनी अधोरेखित केली. कर्मवीरांनी रोवलेले कमवा आणि शिका योजनेचे चे बीज आज जगभर अंगीकृत केले गेले आहे.” असे प्रतिपादन पंढरपूर येथील युवा उद्योजक मा. शशिकांत कराळे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले महाविद्यालय, नव महाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय, पिंपरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी असेही सांगितले की महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या कर्मवीरांनी विविध जाती धर्मातील मुलांना एकत्रित राहून शिक्षण घेण्याची संधी वसतीगृहांच्या उभारणीतून दिली.
पारंपारिक शिक्षणाबरोबरच उद्योजकीय शिक्षणाची असलेली गरज त्यांनी अधोरेखित केली.रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, साताराचे माजी चेअरमन मा. साहेबराव पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या जुन्या आठवणी सांगतानाच त्यांच्या निर्भय व्यक्तिमत्वाविषयी विवेचन केले. कर्मवीरांच्या काळातील सामाजिक परिस्थितीचा उल्लेख करतानाच दुर्गम भागातील गरीब रयतेच्या झोपडीत अण्णांनी केलेल्या शिक्षणाच्या प्रसाराविषयी त्यांनी माहिती दिली. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात मूळ रयतचे स्वरूप अबाधित राखून शिक्षकांना स्वतःला व आपल्या विद्यार्थ्यांना घडवावे लागेल याची त्यांनी जाणीव करून दिली. शिक्षकांनी स्वतःचे SWOC Analysis करून स्मार्ट बनण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडात नावाजलेली संस्था असून इतर संस्थांबरोबर तिची तुलनाच करता येणार नाही असे मत व्यक्त केले. या रयत शिक्षण संस्थेत शिकलेले विद्यार्थी आज मोठ-मोठ्या पदांवर काम करत आहेत व समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहेत हे सांगतानाच आज व्यावसायिक शिक्षणाची असलेली गरज त्यांनी अधोरेखित केली.
याप्रसंगी प्रास्ताविक व स्वागत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) पांडुरंग भोसले यांनी केले. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा परदेशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी सांगवी येथील उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व मा. विजय कामठे व त्यांच्या पत्नी प्रमिला कामठे, माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते श्री संजय गायके, पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्रीमती काकडे , प्रा. शहाजी माने, नाणेकर सर, यशवंत गायकवाड , सात देशांचे सायकल भ्रमण करणारे श्री. चोफे आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा. भाऊसाहेब वाघेरे,श्री.नाणेकर,वाणिज्य विद्याशाखेचे उपप्राचार्य प्रो. (डॉ.) सुहास निंबाळकर,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रो.(डॉ.)दत्तात्रय हिंगणे, विज्ञान विद्याशाखेच्या उपप्राचार्य प्रो. (डॉ.) संगीता अहिवळे, कला विद्याशाखेच्या उपप्राचार्य प्रो. (डॉ.) कामायनी सुर्वे, IQAC समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे, सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ.शुभदा लोंढे,ज्युनिअर विभागाच्या पर्यवेक्षक प्रा. रुपाली जाधव, सर्व विभागप्रमुख व तिन्ही शाखांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी आणि प्रा. अनुप्रिया प्रभू यांनी केले.नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री.अश्रफ पठाण यांनी उपस्थितांप्रती आभार व्यक्त केले.कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने कर्मवीरांच्या जीवनावर आधारित निबंध, प्रश्नमंजूषा व पोस्टर स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.













